मुंबई : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हिंदी भाषेवरून झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. हिंदी भाषेबाबत त्यानं केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता अजय देवगणनं त्याला ट्वीट करत उत्तर दिलं होतं. आता किच्चा सुदीप त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रांत रोना’मुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या किच्चाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांबाबत भाष्य केलं आहे.
किच्चा सुदीपचा 'विक्रांत रोना' चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा किच्चा सुदीपच्या करिअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. तर 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत किच्चाने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांवर वक्तव्य केले आहे. 'केजीएफ' सारखा चित्रपट हिंदीमध्येही सुपरहिट ठरला याबाबत किच्चा सुदीपला प्रश्न विचारण्यात आला. यावर किच्चा सुदीप म्हणाला, "जेव्हा चित्रपटाची कथा ही अप्रतिम असते तेव्हा तो चित्रपट प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतो प्रेक्षकांना आवडतो आणि तो चित्रपट सुपरहिट होतोच."
पुढे किच्चा सुदीप म्हणाला, "आम्ही दक्षिणेत 'हम दिल दे चुके सनम', 'मैने प्यार किया', 'शोले', 'हम साथ साथ है' आणि 'कभी खुशी कभी गम' हे चित्रपट अजूनही पाहतो. आम्ही बंगळुरुच्या चित्रपटगृहात गुजराती आणि पंजाबी लोकांच्या कथा पाहतो. यामुळे या सगळ्या गोष्टीचा आणि संस्कृतीचा काहीही संबंध नाही. जर मी तुम्हाला काही नवीन दाखवलं जे तुम्ही कधी पाहिलं नाही, तर तुम्हाला ते पाहण्याची उत्सुकता असेल."
पुढे दाक्षिणात्य चित्रपट आता उत्तरेतील चित्रपटगृहात प्रदर्शित होतात जे आधी होत नव्हतं यावर आनंद व्यक्त करत किच्चा सुदीप म्हणाला, "प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. आधी दाक्षिणात्य चित्रपट उत्तरेत फक्त सॅटेलाईट टीव्ही चॅनलवर पाहायला मिळायचे. जेव्हा मी दिल्ली, गोवा, मुंबई, जयपूर किंवा कोणत्या दुसऱ्या शहरात जायचो तेव्हा लोक मला ओळखायचे आणि म्हणायचे मी 'बाजीराव'मधला हीरो आहे. कारण माझा 'कॅम्पे गौडा' हा चित्रपट हिंदीत डब झाला होता आणि त्या चित्रपटाला 'बाजीराव' हे टायटल दिले होते. तेव्हा लोक आम्हाला सॅटेलाईट स्टार म्हणून ओळखायचे. आता आमचे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत."