मुंबई : 'जत्रा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज तब्बल 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ज्या ठिकाणी झालं ते गावं कसं आणि कुठे आहे असा प्रश्न गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांना पडला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचं गाव आता समोर आलं आहे. चित्रपटाचं चित्रीकरण हे सातारा जिल्ह्यातील एका गावांमध्ये करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुन्हा एकदा त्या गावात गेले होते. 17 वर्षांपूर्वी हे गाव कसं होतं आणि आता कसं आहे हे केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
केदार शिंदे यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, '28 ऑक्टोबर 2005 साली जत्रा रिलीज झाला होता. ह्या 28 ला चित्रपटाला 17 वर्ष झाली. एक तो दिवस आहे आणि एक आजचा. ह्या वर्षांमध्ये जत्राने महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना अगणित वेळा हसवलं आहे. त्याच्या गाण्यांनी कैक कार्यक्रम आणि डी जे पार्टीज रंगवल्या आहेत. कित्येकांच्या आयुष्याचा भाग बनलेला 'जत्रा' आमच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.' (Kedar Shinde Shares Glimps Of Jatra Movie Shooting Village how this looks after 17 years)
पुढे केदार शिंदे म्हणाले, 'सध्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेलेलो असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणांना भेट दिली जिथे 'जत्रा' शूट झाला होता आणि कित्येक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता सगळं बदललं आहे पण अजून आपली जत्रा तशीच आहे!'
त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी 'जत्रा २' ची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहोत असे म्हटले आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, विजय चव्हाण, कुशल बद्रिके, क्रांती रेडकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली.
'ह्यालागाड आणि त्यालागाड' गावाचं 17 वर्षानंतर रुप कसं झालं, पाहा व्हिडीओ