मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करण हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नेहमीच चर्चेत असणाऱ्या करणनं ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इतकं होऊनही नेटकऱ्यांनी करणला ट्रोल केलं आहे.
करणनं ट्विटरवर एक ट्वीट शेअर करत ही बातमी दिली. हे ट्वीट शेअर करत करण म्हणाला, 'माझ्या आयुष्यात सकारात्मकता वाढवण्यासाठी घेतलेलं हे पहिलं पाऊल. गूडबाय ट्विटर.' (Karan Johar Left Twitter And Said Goodbye Making Space For More Positive Energies Only And This Is Step One)
करणनं ट्विटरचा निरोप घेतल्यानंतरही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'सर, तुम्हाला संपूर्ण भारतात शांतता आणि आनंद हवा असेल तर इंटरनेटवर असलेला कॉफी विथ करण हा कचराही हटवा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुला कोणीही मिस करणार नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'शाहरुखशिवाय तुम्हाला कोणीही मिस करणार नाही.'
याआधीही करण सोशल मीडियावरील नकारात्मकतेमुळे त्रस्त असल्याचे म्हटले जात होते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात लोक संतापले. या प्रकरणी सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल होण्यासोबतच त्याच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता.