'कपूर हवेली' लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता

'कपूर हवेली' पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती.

Updated: Jul 13, 2020, 01:38 PM IST
'कपूर हवेली' लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता title=

इस्लामाबाद : बॉलिवूड दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पाकिस्तानमधील वडिलोपार्जित 'कपूर हवेली' जमीनदोस्त करण्याची तयारी सुरू झाली आहे. हवेलीच्या सध्याच्या मालकाने या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स  बांधण्याचा घाट घातला आहे. २०१८ साली ऋषी कपूर यांनी पाकिस्तानी सरकारला 'कपूर हवेली' वस्तुसंग्रहालयात रुपांतरीत करावी अशी विनंती केली होती. सरकारकडून यासंबंधी निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु हवेलीच्या मालकाशी करार होऊ शकला नाही.
 

'कपूर हवेली'चा मालकी हक्क सध्या जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांच्याकडे आहे. खैबर-पख्तुन्वा प्रांतातील पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार परिसरातील ‘कपूर हवेली’जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता आहे. 

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे की, हवेलीत भुतांचं वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे हवेली मोडकळीस आली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. हवेलीचे सध्याचे मालक हाजी मुहम्मद इसरार सध्या सरकारला हवेली देण्यास तयार नाही.

'कपूर हवेली' पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती. हवेलीचे ऐतिहासीक महत्त्व लक्षात घेत. सरकारला ही हवेली पर्यटनासाठी जतन करून ठेवायची आहे. परंतु इसरार याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याच्या विचारात आहे.