मुबंई : विविध भूमिका मोठ्या ताकदीने निभावणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिने येत्या काळातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याचा निर्धार केला आहे. आगामी 'पंगा' या चित्रपटासाठी ती करत असलेली तयारी पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. कंगनाच्या याच मेहनतीसाठी तिला चित्रपटाच्या टीमकडूनही खास भेट देण्यात आली आहे. ही भेट आहे, अर्थातच पोटभर जेवणाची. तेसुद्धा दाक्षिणात्य खाण्याची.
सहसा चित्रपट आणि विविध भूमिकांसाठी मेहनतच घेणारी बी टाऊनची ही क्वीन तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींचं आणि व्यायामाच्या वेळापत्रकाचं नियमित पालन करत असते. पण, त्यातही घरगुती पद्धतीचं जेवण समोर येताच तिलासुद्धा स्वत:वर ताबा ठेवता आलेला नाही. टीम कंगना रानौत या अधिकृत अकाऊंटवरुन याविषयीचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये कंगना कोणाचीही तमा न बाळगता अक्षरश: त्या जेवणावर ताव मारताना दिसत आहे.
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित 'पंगा' या चित्रपटात कंगना एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत झळकणार आहे. ज्यामध्ये जेसी गिल, नीना गुप्ता आणि रिचा चड्ढा हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये २४ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता दाक्षिणात्य खाण्यावर ताव मारणाऱ्या कंगनाची चित्रपटरुपी 'पंगा' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.