मुंबई : सोशल मीडियामुळं ट्रेंडमध्ये येणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला थक्क करुन जातात. बरं काही गोष्टी नेमक्या का ट्रेंड होत आहेत, हेसुद्धा आकलनापलीकडे असतं. सध्या असंच एक गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. या गाण्याचा ठेका धरत त्यावर काही नेटकरी आणि सेलिब्रिटींनीही रील्स केल्याचं पाहायला मिळत आहे. (Kaccha Badam Song)
'कच्चा बदाम' असे या गाण्याचे बोल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या गाण्याला गाणारा कोणी गायक नाही, ते लिहिणारा लेखक नाही आणि संगीतकारही नाहीच.
भुबन बादायकर असं या सर्वसामान्य व्यक्तीचं नाव. मुळच्या पश्चिम बंगालमधील कुरालजुरी या गावातील तो रहिवासी.
उदरनिर्वाहासाठी तो रस्त्यांवर शेंगदाणे विकतो. पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून तो सायकलवर एक झोळी टांगतो आणि कच्चा बदाम हे गाणं गात अनेकांचं लक्ष वेधतो.
हे गाणं भुबननं स्वत:च तयार केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये शेंगदाण्याला कच्चा बदाम असंही संबोधलं जातं. मुख्य म्हणजे भुबनला फक्त बंगाली भाषाच कळते. पण, त्याचं हे गाणं विविधभाषी लोकांपर्यंत पोहोचलं आहे. जिथं भाषेच्या मर्यादा आड आलेल्या नाहीत.
भुबन त्याच्या घरातील एकमेव कमवता व्यक्ती आहे. पत्नी, मुलगा आणि मुलगी असं त्याचं कुटुंब. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्याच खांद्यांवर. दिवसाला 3- 4 किलो शेंगदाणे विकत 200 ते 250 रुपये इतकी त्याची मिळकत.
10 वर्षांपूर्वीचं गाणं...
जे गाणं 2022 मध्ये लोकप्रियतेच्या शिखऱावर पोहचलं आहे, ते 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलं होतं.
सध्या गाण्याला मिळणारी लोकप्रियता पाहता सरकारनं आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी भुबन करत आहे. इथं लक्षात घेण्याची बाब अशी, की प्रसिद्धीपेक्षाही भुबनला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचीच जास्त काळजी.
गाणं व्हायरल झाल्यापासून अनेकजण कुतूहलाने त्याचं गाणं ऐकू लागले आहेत आणि त्याच्याकडून शेंगदाणेही विकत घेऊ लागले आहेत. हा काय तो त्याला आतापर्यंत झालेला फायदा.