'तान्हाजी...' म्हणजे एक मोठा योगायोग- देवदत्त नागे

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देवदत्त नागे एका शूर योद्ध्याच्या भूमिकेत समोर येत आहे.   

Updated: Nov 22, 2019, 03:25 PM IST
'तान्हाजी...' म्हणजे एक मोठा योगायोग- देवदत्त नागे  title=
'तान्हाजी...'

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : नरवीर तान्हाजी यांच्या शौर्यगाथेवर प्रकाशझोत टाकत 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर या चित्रपटातील काही पात्रांवर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या. असं एक पात्र किंवा असा एक कलाकार म्हणजे, अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. 'जय मल्हार' या मालिकेतून 'खंडेराय' होऊन अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या रुपात झळकलेला हा अभिनेता 'तान्हाजी'मध्ये सुभेदार सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकत आहे. 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांनी साकारलेल्या निर्भीड भूमिकेची अंगावर काटा आणणारी काही दृश्यंही पाहायला मिळतात. याच भूमिकेविषयीच्या खास 'योगायोगा'संबंधी देवदत्तने 'झी २४तास'शी संवाद साधत काही गोष्टींचा उलगडा केला. 'तान्हाजी' हा एक मोठा योगायोग आहे असं म्हणत 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणाऱ्या देवदत्तने चित्रपटाशी असणारं त्याचं नातं सर्वांसमोर ठेवलं. 

कोंढाण्यावर झालेल्या चढाईतील तारखांचा संदर्भ मांडत त्या आधारे पाहिल्यास चार तारीख, शनिवार, नवमी असे एकंदर संदर्भ लागले. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच तो पाहिल्यानंतर देवदत्तने दिग्दर्शक ओम राऊतला फोन केला. अर्थात हा फोन एका योगायोगाची गोष्ट सांगण्यासाठीचा होता. ज्या चढाईची इतिहासात नोंद आहे, त्याची तारीख, तिथी यांच्याशी देवदत्तचा एक लक्षवेधी संबंध आहे. कारण तारीख, तिथी आणि वेळ पाहता ही त्याची जन्मतारीख आहे. त्यामुळे हा दैवी योगायोग म्हणावा किंवा आणखी काही. पण, याचविषयी सांगण्यासाठी म्हणून हळव्या मनाने त्याने ओम राऊतला फोन केला. पाच फेब्रुवारी, पहाटे चार वाजता नवमी... असं सारं त्याने स्पष्ट केलं आणि खऱ्या अर्थाने हाच योगायोग त्याला चित्रपटाशी सुरुवातीलाच जोडून गेला. 

फोन केल्यानंतर या दोघांच्याही चर्चा पुढे गेल्या. अजय देवगन चित्रपटात तान्हाजींच्या भूमिकेत झळकत असल्याविषयीचं समाधान त्याने व्यक्त केलं. ज्या रायगड जिल्हयामध्ये आपण राहतो, ज्या रायगडावर वावरतो, त्याच रायगडाच्या आणि मराहाष्ट्राच्या दैवताची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द अशा मोठ्या स्तरावर साकारली जात असल्याचा प्रचंड आनंद त्याने व्यक्त केला. 

पुढच्याच क्षणाला ओम राऊतने देवदत्तला चित्रपटात काम करण्यासाठीची इच्छा व्यक्त केली. एकंदर शरीरयष्टी, घोडेस्वारीची आवड अशी जो़डगोळी मिळून आल्यामुळे देवदत्तनेही यासाठी मोठ्या मनाने होकार दिला आणि सुरुवात झाली एका अभिमानास्पद प्रवासाला. 

अन् मिळाली सूर्याजींची भूमिका

'राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची आत्मियता व्यक्त करत त्यांच्यासाठी काही करायचं असल्यास मी एक भाला घेऊनही उभा राहीन' अशा शब्दांत देवदत्तने चित्रपटासाठी त्याची तयारी दाखवली. त्याला दोन भूमिकांसाठी म्हणजे तान्हाजी यांचे वडील आणि त्यांचे बंधू अशा भूमिकांसाठी पसंती देण्यात आली होती. पण, चित्रपटातील अनेकांनीच देवदत्तने प्रती तान्हाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या (तान्हाजींच्या) धाकट्या भावाची, सूर्याजींची भूमिका साकारावी यावर एकमत झालं. 

'मुळात सूर्याजी यांचाही पराक्रम मोठा होता असं, सांगत ऐतिहासिक संदर्भ देवदत्तने पुढे ठेवले. तान्हाजींनी देह ठेवल्यानंतर खुद्द महाजारांची सूर्याजींना सुभेदारपद बहाल केलं होतं. मुळात हे पद तितकंच मोठं आणि महत्त्वाचं आहे', असं तो म्हणाला. पराक्रम करा आणि पुढे जा या धर्तीवर तेव्हाच्या काळी घराणेशाहीला जागा नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत देवदत्तने त्याच्या भूमिकेची ओळख करुन दिली. खंडेरायांनी आपल्याकडून 'जय मल्हार' करुन घेतला त्याचप्रमाणे सूर्याजीही करुन घेत आहेत असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. एक अभिनेता म्हणून आपण साकारलेल्या भूमिकेच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे, असं म्हणत 'तू योद्धा वाटत आहेस....', 'सूर्याजी हवा तर असाच....' या प्रतिक्रिया सुखावून जात असल्याचं तो म्हणाला. 

अशी केली सूर्याजीसाठीची तयारी..... 

'मुळात माझी शरीरयष्टी ही रुंद आणि पिळदार. पण, अजय देवगणच्या अंगकाठीला साजेसं रुप आणण्यासाठी आणि अर्थातच चपळाईच्या अनुषंगाने एक योद्धा साकारण्यासाठी मी काही गोष्टींमध्ये बदल केला. शरीरातील चरबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करत स्नायूंच्या व्यायामावर जास्त भर दिला', असं म्हणत सूर्याजीसाठीची तयारी त्याने सर्वांसमोर ठेवली. यामध्ये त्याला मदत झाली ती म्हणजे घोडेस्वारीच्या आवडीची, शस्त्रप्रेमाची आणि महाराजांवरील निस्सिम प्रेमाची.  

देवदत्तने या चित्रपटात काही अद्वितीय साहसदृश्यंही केली. मुळात पडद्यावर थरारक वाटणारी ही दृश्य साकारण्यासाठी त्याला काही आव्हानांचाही सामना करावा लागला होता. ही सासहसदृश्य साकारण्यासाठी थेट हॉलिवूडमधील तज्ज्ञांना पाचरण करण्यात आलं होतं. याविषीयी त्याने महत्त्वाचा उलगडा केला. देवदत्तसोबतच्या या मुलाखतीतील आणखीही काही गोष्टी आणि त्याने अनुभवलेला 'तान्हाजी' यापुढेही दोन टप्प्यांत वाचकांच्या भेटीला येणार आहे. 

SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com