'एकटेपणा जाणवत होता आणि रडायची...', प्रेग्नंसीनंतरच्या काळात इशिता दत्तानं केला नैराश्याचा सामना

Ishita Dutta on postpartum : इशिता दत्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिला बाळाला जन्म दिल्यानंतर काय काय त्रास झाला याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2023, 06:32 PM IST
'एकटेपणा जाणवत होता आणि रडायची...', प्रेग्नंसीनंतरच्या काळात इशिता दत्तानं केला नैराश्याचा सामना title=
(Photo Credit : Social Media)

Ishita Dutta on postpartum : अभिनेत्री इशिता दत्ता काही दिवसांपूर्वीच आई झाली. प्रत्येक महिलेच्या आयुष्याला मातृत्व पूर्ण करतं असं म्हटलं जातं. पण प्रसूतीनंतर चार आठवड्यांनंतर तिला नैराश्याचा सामना करावा लागल्याचे तिने  नुकतेच उघड केले आहे. या काळात तिला अनेकदा एकटं वाटायचं आणि रडायची इच्छा व्हायची असं तिने सांगितलं आहे. इशिता दत्तानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या अनुभवांबद्दल बोलत आहे आणि आई बनू पाहणाऱ्या स्त्रियांना सल्ला देत आहे. 

इशितानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. इशितानं जुलै महिन्यात मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिचं आयुष्य कसं झालं याविषयी इशितानं सांगितलं आहे. प्रसूतीनंतर तिला डिप्रेशनचा सामना करावा लागला. ती आता यातून हळूहळू बाहेर पडत असली तरी प्रसूतीनंतर तिच्या शरीरात अनेक बदल झाल्याचे तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ती रात्री नीट झोपू शकत नव्हती किंवा दिवसा नीट खाऊ शकत नव्हती. तिला शरीरात वेदना होत होत्या आणि तिला मानसिक थकवा जाणवत होता. आपल्या बाळाला स्तनपान करू न शकल्याबद्दल ती स्वतःला दोषी ठरवू लागली, मात्र हे बदल प्रसूतीनंतर सामान्य असल्याचेदेखील तिने स्पष्ट केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इशिताने खुलासा केला की प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या आठवड्यात तिला अनेकदा एकटेपणा जाणवत होता आणि ती रडायची. आजूबाजूला तिचं कुटुंब असूनही, तिला एकटेपणाची भावना जाणवली. मात्र, तिचा पती म्हणजे वत्सल सेठसारखा सपोर्टिव्ह पार्टनर मिळाल्याबद्दल देखील ती स्वतःला भाग्यवान समजते, जो केवळ एक उत्तम पिताच नाही तर काळजी घेणारा पती आणि मित्र देखील आहे. तो तिला ड्राईव्हवर घेऊन जायचा आणि तिच्यासाठी कॉफी बनवायचा, ज्यामुळे तिला खूप मदत झाली. इशिताने सांगितले की तिचे आईवडील देखील बाळाला सांभाळण्यासाठी तिला मदत व्हावी म्हणून तिथे पोहोचले होते. मला आराम मिळावा म्हणून ते बाळाला सांभाळू लागले. 

याशिवाय, इशिता दत्तानं नुकत्याच आई झालेल्या किंवा आई होणाऱ्यांना सल्ला देखील दिला आहे. ती म्हणाली की रडणे किंवा एकटेपणा वाटणे ठीक आहे आणि त्यात काहीही चुकीचं नाही. त्यासोबत तिनं सर्व वडिलांना अशा काळात नुकतीच आई झालेल्या पत्नीला आधार देण्यास प्रोत्साहित केले, त्यांचा हात धरा, सर्वकाही ठीक होईल याची त्यांना खात्री पटवून द्या आणि गोष्टी ठीक होण्यासाठी काही आठवडे द्या असा सल्ला दिला. 

हेही वाचा : करिश्मा कपूरमुळे अक्षय खन्ना आजही अविवाहित, त्या एका घटनेने सगळं आयुष्यच बदललं

इशिता दत्ता ही एक लोकप्रिया अभिनेत्री आहे. तिच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'दृश्यम' आणि 'फिरंगी' सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. याशिवाय ती टीव्ही मालिकांमध्ये देखील दिसली. इशिता दत्ता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. तर तिचा पती वत्सल शेठ हा देखील एक अभिनेता आहे. वत्सल सेठने 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तो 'जस्ट मोहब्बत' आणि 'एक हसीना थी' सारख्या मालिकांमध्ये देखील दिसला होता.