वडिलांना कॅन्सर... हृतिकने दिली माहिती

मला ठाऊक होतं की.... 

Updated: Jan 8, 2019, 12:35 PM IST
वडिलांना कॅन्सर... हृतिकने दिली माहिती  title=

मुंबई : नवं वर्ष सुरू होऊन अवघे काही दिवसही उलटले नाहीत, तोच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप यांना कॅन्सरने ग्रासल्याचं गेल्या वर्षी स्पष्ट करण्य़ात आलं. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीलाही आणखी एका अभिनेत्याच्या आजारपणाचं वृत्त समोर आलं असून, त्यांनाही कॅन्सरने ग्रासल्याचं कळत आहे. 

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर असून, पहिल्याच स्तरावर असणाऱ्या या कॅन्सरवर तातडीने उपचारही सुरू करण्यात आले आहेत. अभिनेता हृतिक रोशन यानेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली. 

'आज मी माझ्या वडिलांसोबत हा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मला ठाऊक होतं की, उपचार, शस्त्रक्रियेच्या दिवशीही ते व्यायाम करणं टाळणार नाहीत. मी आतापर्यंत पाहिलेले ते सर्वाधिक बळकढ आणि सुद्ढ व्यक्ती आहेत. प्राथमिक स्तरातील squamous cell carcinomaशी ते झुंज देत आहेत', असं लिहित काही आठवड्यांपूर्वीच त्यांना या आजाराचं निदान झाल्याचं हृतिकने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.  

वडिलांनाच आपल्या कुटुंबाचा आधार म्हणत असा खंबीर आणि धीट आधार असणं हे आमचं भाग्यच असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हृतिकने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये राकेश रोशन आणि तो असे दोघंही जीममध्ये दिसत असून, त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे आजारपणातही हृतिकच्या वडिलांची लढाऊ वृत्ती ही खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देत आहे, असं म्हणायला हरकत नाही.