मुंबई : भारतीय प्रेक्षकांमध्ये 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता हृतिक रोशनचा चाहता वर्ग फक्त या देशापुरताच सीमित नाही. सातासमुद्रापलीकडेही त्याच्या नावाची चर्चा असते. बी- टाऊनच्या या हँडसम हंकच्या अनोख्या अंदाजाची भुरळ सध्या चीनमध्येही पडल्याचं कळत आहे. याला निमित्त ठरतोय तो म्हणजे 'काबिल' हा चित्रपट.
हृतिकची मुख्य भूमिका असणारा 'काबिल' हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये त्याची चांगलीच हवा पाहायला मिळत आहे.
Another poster of #Kaabil for the local audience in #China... #Kaabil is Hrithik's first film to release there... 5 June 2019 release. pic.twitter.com/5RyoukE9n0
— taran adarsh (@taran_adarsh) May 14, 2019
मुख्य म्हणजे त्या ठिकाणी हृतिकचं वेड इतक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे की चाहत्यांनी त्याला एका नव्या नावाने संबोधण्यास सुरुवात केली आहे. हृतिकला देण्यात आलेलं हे नवं नाव आहे, 'दा शुआई'. ज्याचा अर्थ होतो, सर्वात अप्रतिम.
चीनमध्ये 'काबिल' प्रदर्शित होताच हृतिकला तिथल्या प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही त्याच्यासाठी आनंदाचीच गोष्ट ठरत आहे. येत्या काळात या प्रतिसादाचं रुपांतर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवरही होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या एकूण कमाईत भर पडणार यात शंकाच नाही.
एकिकडे चीनमध्ये हृतिक 'काबिल' ठरत आहे, तर दुसरीकडे भारतात त्याच्या 'सुपर ३०' या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आनंद कुमार या गणित तज्ज्ञांची व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारत आहे, ज्याचं कथानक सत्य घटनांपासून प्रेरित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला ज्याला चाहते आणि कलाविश्वातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.