Home Minister : महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमानं महिलांच्या मनात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या पैकी अनेकांनी लहाण असताना हा कार्यक्रम पाहिला आहे किंवा आपल्या शेजारी कुठे हा कार्यक्रम झाल्याचे आपण ऐकले आगे. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे महाराष्ट्राचे भावोजी झाले. हा कार्यक्रम गेल्या 19 वर्षापासून जमेल तेवढ्या महिलांना सन्मान आणि सत्कार करताना दिसत आहे. या कार्यक्रमानं आता 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. हा प्रवास नेमका कसा सुरु झाला याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे.
आदेश बांदेकर यांनी नुकतीच मुंबई तकला मुलाखत दिली होती. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात आणि संपूर्ण प्रवास याविषयी सांगितलं आहे. 13 दिवसांसाठी सुरु करण्यात आलेल्या हा कार्यक्रम 20 व्या वर्षात पोहोचला हे सांगत आदेश बांदेकर म्हणाले, 'झी मराठी वाहिनीवर एक मालिका बंद झाली होती आणि दुसरी मालिका सुरु होणार होती. यादरम्यानच्या वेळात दोन आठवड्यांसाठी काहीतरी करावं अशा भावनेतून कार्यक्रम सुरु झाला. याच काळात मी स्ट्रगल करत होतो. त्याच दरम्यान, झीच्या अशाच चकचकीत कार्यालयात मी गेलो आणि काही माऊली तिथे बसल्या होत्या. मी त्यांच्याशी काहीतरी बोललो. लगेच सर्वजणी हसल्या. त्या हसलेलं पाहून नितीन वैद्य केबीनमधून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी बांदेकर आत या, असे म्हटले. मी आत गेलो, तिथे गप्पा सुरु झाल्या. आता तू जे काही केलंस, तसं घरी जाऊन कुटुंबाशी गप्पा मारशील का? असं मला त्यांनी विचारलं. मी त्यांना हरकत नाही म्हटले.'
पुढे पहिल्या एपिसोडच्या शूटिंगविषयी सांगत आदेश बांदेकर म्हणाले, 'मी दोन कॅमेरे घेऊन निघालो. लालबागमधील हाजी कासम बिल्डींग याच बिल्डींगमध्ये प्रोमो शूट करायचं असं आमचं ठरलं. तिथे गेल्यानंतर गाण्याची पहिली ओळ दार उघड वहिनी, दार उघड अशी आहे. पण जेव्हा मी त्या बिल्डींगमध्ये गेलो, तेव्हा पटापट त्या वहिनी दरवाजे बंद करु लागल्या. त्या सर्वसामान्य स्त्रिया होत्या. त्यांना एक प्रश्न विचारल्यावर त्या पळायला लागल्या. त्यानंतर पहिला एपिसोड 22 मिनिटांसाठी शूट करायचा होता. तो एपिसोड आम्ही शूट केला. तो भाग आम्ही निखिल साने, नितीन वैद्य, अजय बाळवणकर यांना दाखवला. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही हावभाव नव्हते. त्यावेळी नितीन वैद्य यांनी त्या ऑफिसमध्ये काम करणारे, हाऊसकिपिंगची मंडळी अशा लोकांना बोलवलं. त्याच्यासमोर तो भाग परत लावला. तो एपिसोड पाहिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ठरलं की या कार्यक्रमाला कोणत्याही तांत्रिक गोष्टी लागू करायच्या नाहीत. ती गृहिणी रिटेक घेणार नाही, अशा पद्धतीने याचे चित्रीकरण केले जाईल.'
आदेश बांदेकर त्यांचा हा प्रवास सांगत म्हणाले, 'फक्त 13 दिवसांसाठी एक मालिका बंद होणार होती, म्हणून हा कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. आता 14 लाखाहून जास्त किलोमीटरचा प्रवास करुन ही आनंदाची यात्रा 19 वर्ष पूर्ण करुन 20 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 12 सप्टेंबर 2004 ला याचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.'
हेही वाचा : रवीना टंडननं मुलांपासून लपवले नाही जुने रिलेशनशिप्स! कारण सांगत म्हणाली...
दरम्यान, या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना समस्त महाराष्ट्राच्या घरा-घरात भावोजी म्हणून ओळख मिळाली. या कार्यक्रमाचे आता पर्यंत 6 हजार एपिसोड प्रदर्शित झाले आहेत आणि 12 हजार घरांना त्यांनी भेट दिली आहे.