सेलिब्रिटी व्हायोलिन वादकाच्या अपघाती निधनाचा तपास CBI च्या हाती

नेमकं काय झालं होतं?

Updated: Jul 30, 2020, 10:16 AM IST
सेलिब्रिटी व्हायोलिन वादकाच्या अपघाती निधनाचा तपास CBI च्या हाती  title=
संग्रहित छायाचित्र

तिरुवअनंतपूरम : लोकप्रिय गायक, संगीतकार आणि व्हायोलिन वादक बालाभास्कर आणि त्यांच्या मुलीचं २०१८ मध्ये एका कार अपघातात निधन झालं. ज्याचा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार केरळ सरकारनं या प्रकरणीचा पुढील तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला आहे. 

बालाभास्कर यांचे निकटवर्तीय प्रकाश थंपी यांना याप्रकरणी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बालाभास्कर यांच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत केरळ सरकारकडे याबाबतच्या तपासासाठीची धाव घेतली होती. केरळ पोलिसांकडून या प्रकरणीची प्राथमिक कारवाई करण्यात आली होती. ज्याअंतर्गत बालाभास्कर यांच्या कारचा चालक अर्जुन याच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं होतं? 

२५ सप्टेंबर २०१८ रोजी बालाभास्कर त्यांची पत्नी आणि मुलीसह थ्रिसूर येथून तिरुवअनंतपूरमच्या दिशेने येत होते. त्यावेळी अर्जुन कार चालवत होता. देवदर्शनाहून परतत असताना तिरुवअनंतपूरम येथील पल्लीपूरमजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीररित्या जखमी झाल्यामुळे बालाभास्कर, त्यांची पत्नी आणि अर्जुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनी बालाभास्कर यांचीही प्राणज्योत मालवली. तर अर्जुन आणि बालाभास्कर यांची पत्नी मात्र या अपघातातून बचावली होती.