मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या जोडीने प्रेक्षकांचं बराचकाळ मनोरंजन केलं. पण यावर्षी दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसले नाही.
कपिल झालेल्या प्रकाराबद्दल अनेकदा सुनीलची माफीही मागितली आहे. त्याने पहिले सोशल मीडियात पोस्ट करून आणि नंतर कार्यक्रमातूनही माफी मागितली. पण सुनीलचा राग कमी झाला नाही. आता पुन्हा एकदा ही जोडी छोट्या पडद्यावर एकत्र बघण्याची संधी मिळू शकते.
नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने सांगितले की, लवकरच तो सुनीलसोबत एक नवीन शो घेऊन येत आहे. सुनील कॅनडाहून परत आल्यावर ते दोघे आपल्या नव्या शोबाबत चर्चा करतील. ब-याच दिवसांपासून त्याची सुनीलसोबत भेट झाली नाही. पण ते मेसेच्या माध्यमातून ऎकमेकांसोबत बोलत आहेत. मला आशा आहे की, तो माझ्यासोबत परत येईल. इतरही कलाकार सोबत काम करण्यासाठी तयार आहेत.
कपिलने सुनीलसोबत झालेल्या भांडणावरही भाष्य केलं. कपिल म्हणाला की, त्याने शो सोडल्यानंतर मी काही म्हणालो नाही. त्यांच्यातील भांडणाला इतका मोठा मुद्दा बनवला गेला की, त्यांची मैत्रीही त्यात प्रभावित झाली. मी सुनीलला हे समजावण्याचा प्रयत्नही केला होता की, प्रत्येकाकडून चूक होते आणि मी सुद्धा केली आहे.