अमिषा पटेलला खूप माज, वडील श्रीमंत असल्याने...; 'गदर 2' च्या यशानंतर अनिल शर्मा स्पष्टच बोलले

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अमिषा पटेलच्या स्वभावावर बोलताना ती फार श्रीमंत कुटुंबातून येते असं सांगितलं आहे. तसंच आपण जेव्हा तिची गदर चित्रपटासाठी निवड केली तेव्हा ती अभिनयात फार कच्ची होती असंही सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 30, 2023, 11:41 AM IST
अमिषा पटेलला खूप माज, वडील श्रीमंत असल्याने...; 'गदर 2' च्या यशानंतर अनिल शर्मा स्पष्टच बोलले title=

'गदर 2' चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अभिनेत्री अमिषा पटेल ही मोठ्या घरची मुलगी असून, कधी कधी फार माज दाखवते असं स्पष्टच म्हटलं आहे, पण ती चांगल्या मनाची मुलगी आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. Bollywood Hungama ला दिलेल्या मुलाखतीत, अनिल शर्मा यांनी आमच्या नात्यात सतत चढ उतार येत असतानाही, ती एक चांगली व्यक्ती असल्याचं सांगेन असं म्हटलं आहे. दरम्यान, सकिनाच्या भूमिकेसाठी जेव्हा पहिल्यांदा अमिषाची निवड केली तेव्हा ती फार कच्ची अभिनेत्री होती असा खुलासा अनिल शर्मा यांनी केला आहे. या चित्रपटासाठी तिला 6 महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

अमिषा पटेलसह सध्या तुमचं नातं कसं आहे ? असं विचारण्यात आलं असता अनिल शर्मा यांनी सांगितलं की "माझे कधीही कोणाशी संबंध बिघडत नाहीत. भांडणंही झाली, पण नंतर सगळं सुरळीत झालं. अमिषा पटेलचा स्वभाव असाच आहे. पहिल्या गदरच्या वेळी जेव्हा आमची भेट झाली होती, तेव्हा भांडणंही झाली होती. ती मोठ्या घरची मुलगी आहे, त्यामुळे तिचे काही थाट आहेत. पण ती मनाने वाईट नाही. मोठ्या घरच्या मुलींमध्ये अनेकदा माज येतो. पण आम्ही छोट्या घरातून आलो आहोत. आम्ही लोक प्रेमाने राहतो. ती पण राहते. पण थोडा माज आहे. तिच्या एक अदा आहे जी कधीकधी वाकडी होते. पण माणूस चांगली आहे".

जुलै महिन्यात अमिषा पटेलने अनिल शर्मा यांच्यावर 'गदर 2' च्या शूटदरम्यान गैरव्यवस्थापन केल्याचा आरोप केला होता. अमिषा पटेलच्या आरोपांवर बोलताना अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, "ती असं का म्हणाली याचा मला अंदाज नाही. पण हे सगळं खोटं असून, काहीही खरं नाही इतकंच सांगू शकतो. त्याचवेळी मला अमिषा पटेलचे आभार मानायचे आहेत. तिने माझ्या प्रोडक्शन हाऊसला प्रसिद्ध केलं".

अनिल शर्मा यांनी या मुलाखतीत अमिषा पटेलच्या अभिनय कौशल्यावरही भाष्य केलं. जेव्हा गदर चित्रपटासाठी अमिषाची निवड केली, तेव्हा ती अभिनयात फार कच्ची होती असं अनिल शर्मा यांनी सांगितलं आहे. 

अनिल शर्मा अमिषाबद्दल बोलताना म्हणाले की "आम्हाला चंद्रासारखा चेहरा हवा होता. ती थोडी अभिनयात थोडी कच्ची होती. मी निर्मात्यांनी ही भूमिकेसाठी योग्य आहे, पण अजून एक मुलगी आहे जी चांगला अभिनय करते असं सांगितलं होतं. पण अमिषा श्रीमंत घरातील असल्याने तिच्यात तो माज होता".

अनिल शर्मा यांनी यावेळी आपण कशाप्रकारे अमिषा पटेलला 6 महिने प्रशिक्षण दिलं हे सांगितलं. "मी अमिषाला आपल्यालाला 5 ते 6 महिने प्रशिक्षण घ्यावं लागेल असं सांगितलं. यावर अमिषा पटेलचही तयार झाली होती. यानंत तिला सकिनाच्या भूमिकेसाठी तयार केलं. ती रोज 4 ते 5 तास सराव करत असे," असं अनिल शर्मा यांनी सांगितलं.