फास्टर फेणे - शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा थरारक अनुभव

80 च्या  दशकात लेखक भा. रा. भागवत यांनी  'फास्टर फेणे' या अवलियाला वाचकांसमोर आणलं. लहानग्यांचं विश्व व्यापून टाकणारा 'फेणे' आता 21 व्या शतकात तितक्याच ताकदीनं रूपेरी पडद्यावर आणण्याचं काम  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, पटकथाकार क्षितिज पटवर्धन आणि अभिनेता अमेय वाघ या त्रिकुटाने  यशस्वीरित्या जमवलयं.  

Updated: Oct 27, 2017, 02:26 PM IST
फास्टर फेणे - शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा थरारक अनुभव title=

मुंबई : 80 च्या  दशकात लेखक भा. रा. भागवत यांनी  'फास्टर फेणे' या अवलियाला वाचकांसमोर आणलं. लहानग्यांचं विश्व व्यापून टाकणारा 'फेणे' आता 21 व्या शतकात तितक्याच ताकदीनं रूपेरी पडद्यावर आणण्याचं काम  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, पटकथाकार क्षितिज पटवर्धन आणि अभिनेता अमेय वाघ या त्रिकुटाने  यशस्वीरित्या जमवलयं.  

सस्पेंस,थ्रिलर या बाजाचा 'फास्टर फेणे' प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. 'वेग' हा या चित्रपटाचा युएसपी आहे. सुमारे दोन ते सव्वा दोन तास प्रेक्षकांना चित्रपटामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या चित्रपटाचे 'बॅकग्राऊंड म्युझिक' आणि 'ड्रोन'च्या मदतीने टिपलेले काही सीन्स बाजी मारून जातात.

चित्रपटाची कथा काय ?  

बनेश फेणे (अमेय वाघ)  हा हुशार, चपळ कॉलेजवयीन मुलगा आहे. पुण्यामध्ये मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम देण्यासाठी आलेला असतो. परिक्षेपूर्वी काही वेळ आधी त्याची धनेश या मुलाशी भेट होते. परतीच्या वाटेवर असताना त्याला परिक्षेआधी भेटलेल्या या उमद्या तरूणाने आत्महत्या केल्याचं वर्तमानपत्रातील बातमीतून कळतं.

परिक्षेआधी भेटलेला एक हुशार उमदा तरूण आत्महत्या करूच शकत नाही. हा फेणेचा विश्वास त्याच्या मृत्यूची उकल करण्यास त्याला भाग पाडतो. फास्टर फेणेला या कामामध्ये त्याची बालपणीची मैत्रिण आणि पत्रकार अबोली ( पर्ण पेठे), आजोबा /  भा. रा. भागवत ( दिलीप प्रभावळकर ) आणि भू भू ( शुभम मोरे) मदत करतात. फास्टर फेणे जसजसा तपास करतो तसतशी त्याला अनेक रहस्य उलगडत जातात. दरम्यान हा केवळ खून नसून शिक्षणव्यवस्थेतील एक मोठा घोटाळा असल्याचं लक्षात येते. या घोटाळ्यामागे 'आप्पा' ( गिरीश कुलकर्णी) असतो.  

पैसा, सत्ता यांमुळे उद्दाम झालेला 'आप्पा' फास्टर फेणेसाठी चक्रव्युह रचतो. पण केवळ चलाखीच्या जोरावर फास्टर फेणे हे चक्रव्यूह भेदून 'आप्पा' चा खेळ कसा खल्लास करतो. त्याची खरी मज्जा चित्रपट पाहूनच तुम्हांला घेता येईल.

'सस्पेन्स थ्रिलर'  हा अगदीच अवघड आणि क्वचित निवडला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे रसिक म्हणून तुम्हांला हा विषय आवडत असेल तर 'फास्टर फेणे' हा चित्रपट मुळीच चुकवू नका. एकही गाणं चित्रपटात नाही, आगाऊ स्टंटबाजी नाही. तरीही चित्रपट पाहताना प्रेक्षक म्हणून तुमच्याही मेंदूला चालना देणारा हा चित्रपट मराठी सिनेमातील एक हटके पण यशस्वी प्रयत्न नक्की ठरेल.

स्टार्स - ३.५ स्टार्स