40 Year Old Actor Killed In Car Collision On His Engagement Day: वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं जातं असं मानतात त्याच साखरपुड्याच्या दिवशीच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. सूरज मेहेर असं या अभिनेत्याचं नाव आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथे या अभिनेत्याच्या कारचा अपघात झाला. चित्रपटाचं शुटींग पूर्ण करुन बुधवारी मध्यरात्री हा अभिनेता घरी परत जात असताना भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुरज यांची कार पिकअप ट्रकला धडकली. ओडिशामध्ये बुधवारी सूरज यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. पिपडुला नावाच्या गावाजवळ सरासीवाकडून येणाऱ्या पिकअप ट्रकने सूरज यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात बसली की गंभीर जखमी झालेल्या सूरज यांनी जागीच प्राण सोडला. सूरज हे 40 वर्षांचे होते. सूरज यांना नारद मेहेर नावानेही ओळखलं जायचं.
सूरज सध्या त्यांच्या 'आखरी फैसला' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते. बुधवारी त्यांच्या साखरपुड्याचा सोहळा होता. मात्र त्याच्या आधीच्या दिवशीही ते शुटींमध्येच व्यस्त होते. मंगळवारचा दिवस उलटून गेल्यानंतर मध्यरात्रीनंतर सूरज हे शुटींग संपवून घरी जायला निघाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. छत्तीसगडमधील चित्रपट चाहत्यांमध्ये सूरज मेहेर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. सूरज यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. छत्तीसगडमधील चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी अल्पावधीत बरीच लोकप्रियता मिळवली होती.
सूरज यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असलं तरी काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. अपघात झाला तेव्हा सूरज हे स्वत: गाडी चालवत नव्हते. या अपघातामध्ये सूरज यांच्याबरोबर प्रवास करणारा त्यांचा सहकारी आणि कारचालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर प्राथमिक उपचार करुन अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना बिलासपूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे.
सूरज मेहेर यांच्या अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी ओडिशामधील बाथली येथे सूरज यांचा साखरपुडा होणार होता. सूरज हे बिलासपूरमधील सारिया गावातील रहिवाशी होते. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांबरोबरच छत्तीसगडमधील स्थानिक चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली असून एवढ्या हरहुन्नरी आणि तळागाळातून वर येत आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणाऱ्या अभिनेत्याची अकाली एक्झीट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.