'सैराट'च्या परश्याआधीच लोकप्रियतेच्य़ा शिखरावर पोहोचलेला 'हा' परश्या

काही आठवतंय का? 

Updated: Sep 23, 2019, 01:38 PM IST
'सैराट'च्या परश्याआधीच लोकप्रियतेच्य़ा शिखरावर पोहोचलेला 'हा' परश्या   title=
'सैराट'च्या परश्याआधीच लोकप्रियतेच्य़ा शिखरावर पोहोचलेला 'हा' परश्या

मुंबई : 'धनंजय माने इथेच राहतात का.... ?' असं म्हणत दार ठोठावणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चेहरा आठवतोय ना? 'सैराट'चा परश्या लोकप्रिय आणि व्हायरल होण्याच्याही बरीच वर्षे आधी कलाविश्वात एक असा 'परश्या' प्रकाशझोतात आला होता, ज्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हाच 'परश्या' म्हणजेच परशुराम पार्वती होऊन नऊवारी साडीत सर्वांसमोर आला तेव्हा तर, चाहत्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासही बसला नाही. असा हा 'परश्या' म्हणजेच 'परशुराम' साकारला होता, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. 

लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरीही, त्यांच्या अफलातून अभिनयाचं योगदान असणारे असंख्य चित्रपट मात्र कायम चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. त्यातीलच एक म्हणजे, 'अशी ही बनवाबनवी'. 

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, सुधीर जोशी, विजू खोटे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे या कलाकारांच्या धमाल अभिनयाने साकारलेल्या या चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. '...बनवाबनवी'ची ही खळखळून हसवण्याची अविरत तीस वर्षे कशी उलटली याचा अंदाजही आला नाही, पण, चित्रपटाची जादू मात्र तसुभरही कमी झालेली नाही. 

सोशल मीडिया मीम्सपासून कट्ट्यावर गप्पा मारणाऱ्या मित्रांच्या टोळीमध्ये आजही 'परश्या', 'धनंजय माने' आणि 'सुधीर' यांच्या मैत्रीचे किस्से रंगतात. त्यांनी रंगात आणलेला '....बनवाबनवी'चा गोंधळही पुन्हा पुन्हा आठवून खळखळून हसतात. 'लिंबू कलरची साडी' म्हणू नका, किंवा मग 'हा माझा बायको पार्वती' म्हणज पत्नीची अनपेक्षित अशी ओळख करुन देणं म्हणू नका, या चित्रपटाती प्रत्येक दृश्य हे विनोदाची परिभाषा बदलून टाकणारं, मनमुराद आनंद देणारं. 

सचिन पिळगावकर दिग्दर्शित या चित्रपटातील संवाद, प्रासंगिक विनोद आणि तऱ्हेवाईक पात्र हे म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'चं त्रिकूटच. आजही चित्रपटांच्या या गर्दीत ही बनवाबवनी का गाजतेय, हे जाणून घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा धमाल वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हा चित्रपट जरुर पाहा....