कोलकातात अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, बाईकवरुन आला, काचा फोडल्या आणि...

Kolkata News: कोलकातात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. याचा व्हिडिओ तीने फेसबूकवर शेअर केलाय.  

राजीव कासले | Updated: Aug 23, 2024, 10:29 PM IST
कोलकातात अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, बाईकवरुन आला, काचा फोडल्या आणि... title=

Payel Mukherjee News : कोलकातात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोलकातात (Kolkata) ठिकठिकाणी जनतेकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन केली जात आहेत. आरोपीला कठोर शिक्षा देण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेचीही मागणी केली जात आहे. जनतेचा उद्रेक सुरु असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीच्या (Payel Mukherjee) कारवर हल्ला करण्यात आलाय. पायल मुखर्जीने  फेसबूक लाईव्ह करत हल्ल्याची माहिती दिली आहे. यात ती रडत असून प्रचंड घाबरलेली दिसत आहे. 

काय घडलं नेमकं?
अभिनेत्री पायल मुखर्जीने फेसबूक लाईव्हमध्ये हल्ल्याविषयी सांगितलं आहे. आपल्या कारने साऊथ एव्हेन्यूला जात असतानाच अचानक एक बाईकस्वार आणि त्यांनी आपल्या कारला धडक दिली. त्यानंतर बाईकस्वाराने पायल मुखर्जीला कारची काच खाली घेण्यास सांगितलं. पण भीतीने पायलने काच खाली घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या बाईकस्वाराने कारच्या काचेवर मुक्का मारत काच फोडली. पुढे अघटित घडण्याआधीच सुदैवाने तिथे पोलीस पोहोचले आणि बाईकस्वाराला अटक केली. 

पायलचं फेसबूक लाईव्ह
आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पायलने पोलीस वेळीच पोहोचले नसते तर त्या आरोपीने आपल्याबरोबर आणखी काही भयानक केलं असतं, असं पायलने म्हटलं आहे. या घटनेने अभिनेत्री पायल मुखर्जी पुरती घाबरली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कोलकातात आंदोलनं होत आहेत, पण यानंतरही या शहरात महिला सुरक्षित नाहीत, अशी खंतही तीने व्यक्त केली आहे. 

महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पायल मुखर्जी ही बंगाल चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पायलने बंगाली चित्रपटांबरोबरच तेलुगु चित्रपटातही काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत पाय ठेवण्यातआधी पायल मुखर्जी टेक्नो इंडियात सहाय्यक टीचर म्हणून काम केलंय.  फॉर्माकोलॉजी विषयाची ती शिक्षिका होती. पायल मुखर्जीवरच्या हल्ल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.