मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेता कवी कुमार आजाद आज आपल्याच नाहीत. पण, त्यांनी साकारलेली ‘डॉ. हाथी’ ही भूमिका मात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील अशीच. आजाद यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाला त्याच प्रमाणे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. ‘डॉ. हाथी’च्या भुमिकेतून चाहत्यांना पोट धरून हसवणारा अभिनेता ९ जुलै २०१८ रोजी काळाच्या पडद्याआड गेला होता. मालिकेच्या प्रत्येक कलाकाराला आजही त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कवी कुमार आझाद यांचे निधन झाले होते. वाढलेल्या वजनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले होते. डॉक्टरांनी त्यांना बॅरिएट्रिक सर्जरी करण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मानला नाही. कवी कुमार आझाद यांना वजन कमी करायचे नव्हते.
कारण तसे केल्यास त्यांना डॉ. हाथींच्या भूमिकेला मुकावे लागेल, या भीतीने त्यांनी वजन कमी केले नाही. कवी कुमार आझाद यांच्या मृत्यूनंतर डॉ. हाथी या भूमिकेची जबाबदारी अभिनेता निर्मल सोनी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.