तुम्ही श्रीदेवी यांची हत्या केली? बोनी कपूर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'ती चांगलं दिसण्यासाठी...'

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याकडे संशयाने पाहिलं जात आहे. अनेकांनी तर त्यांनीच हत्या केल्याचा आरोपही केला होता. दरम्यान, त्यावर आता बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 3, 2023, 11:50 AM IST
तुम्ही श्रीदेवी यांची हत्या केली? बोनी कपूर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'ती चांगलं दिसण्यासाठी...' title=

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी भारताबाहेर दुबईत असताना त्यांचं निधन झाल्यानंतर अनेक दावे केले जात होते. या सर्व दाव्यांमध्ये श्रीदेवी यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यावरही अनेक आरोप केले जात होते. दरम्यान बोनी कपूर यांनी The New Indian ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच श्रीदेवी यांच्या निधनावर भाष्य केलं आहे. तसंच त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरही भाष्य केलं आहे. 

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे तर अपघाती होता असं स्पष्ट केलं आहे. तसंच श्रीदेवी यांच्या निधनानंतर दुबई पोलिसांनी केलेल्या तपासात आपली चौकशी करण्यात आल्याचंही स्पष्ट केलं. दुबई पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आपण सर्व प्रकारच्या चाचण्यांना सामोरे गेलो अशी माहिती बोनी कपूर यांनी दिली आहे. यामध्ये lie detector चाचणीचाही समावेश होता. सर्व चौकशीनंतरच बोनी कपूर यांना क्लीन चिट देण्यात आली होती. 

बोनी कपूर यांची चौकशी

बोनी कपूर यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "तो नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर अपघाती मृत्यू होता. मी त्याबद्दल न बोलण्याचं ठरवलं होतं. याचं कारण चौकशीदरम्यान मी सलग 24 ते 48 तास याबद्दल बोललो होतो. अशाच प्रकारे दुबई पोलिसांनी क्लीन चिट दिली. खरं तर अधिकाऱ्यांनी आमच्यावर भारतीय प्रसारमाध्यमांकडून फार दबाव असल्याचं सांगितलं होतं. मी त्यांना मी जे सांगत आहे, त्यापेक्षा अधिक सांगण्यासारखं काहीच नाही असं स्पष्ट केलं होतं. चौकशीदरम्यान त्यांना यात काहीही लपवलं जात नसल्याचं लक्षात आलं. चौकशीदरम्यान मला सर्व प्रकारच्या चाचण्यांना सामोरं जावं लागलं. यामध्ये lie detector सह इतर सर्व चाचण्या होत्या. तसंच रिपोर्टमध्येही पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं".

क्रॅश डाएटमुळे तब्येत बिघडली

बोनी कपूर यांनी यावेळी क्रॅश डाएटमुळे श्रीदेवीच्या आरोग्यावर परिणाम होत होता असाही खुलासा केला. त्यांच्या डॉक्टरने या डाएटसंबंधी तिला इशाराही दिला होता असं त्यांनी सांगितलं. "ती अनेकदा उपाशी राहत असे. तिला चांगलं दिसायचं होतं," असं सांगताना बोनी कपूर यांना थोडं गहिवरुन आलं होतं.

"आपण चांगल्या शेपमध्ये राहावं यासाठी ती प्रयत्न करत होती. कारण स्क्रीनवर आपण चांगलं दिसावं असं तिला वाटायचं," असं बोनी कपूर यांनी सांगितलं. श्रीदेवीचं वजन 46 ते 47 किलो झालं होतं अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी इंग्लिश विंग्लिश चित्रपटाचं उदाहरणही दिलं. तसंच ती मीठ खाणं टाळायची अशी माहिती दिली. 

"माझ्याशी लग्न केल्यापासून तिला अनेकदा अंधारी आली होती. डॉक्टर वारंवार तिला कमी रक्तदाब असून मीठही खाऊ शकत नाही असा डाएट फॉलो करु नको सांगत होते," असा खुलासा बोनी कपूर यांनी केला. मला लग्नानंतर तिच्या या कठोर डाएटची माहिती मिळाली होती. मी फिजिशिअनच्या माध्यमातून तिला अनेकदा जेवणात मिठाचा समावेश करण्यास सांगितंल होतं. ती बाहेर जेवायला गेल्यानंतरही जेवणात मीठ नको असं सांगायची. तिने दुर्दैवाने हे फार गांभीर्याने घेतलं नाही. मलाही जोवर तिचं निधन झालं नाही तोपर्यंत त्याची गांभीर्यता लक्षात आली नाही असं बोनी कपूर म्हणाले आहेत. 

2018 मध्ये दुबईतील हॉटेलात बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी एका लग्नासाठी कुटुंबासह दुबईत गेल्या होत्या.