मुंबई : डिंपल कपाडियाचा पहिला चित्रपट 'बॉबी' 1973 साली रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिने सुपरस्टार राजेश खन्नासोबत लग्न केलं. त्यावेळी डिंपलचं वय अवघं १६ वर्ष होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा डिंपल रातोरात स्टार झाली पण तिला ते स्टारडम जगण्यासाठी वेळ मिळाला नाही. राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर डिंपलने ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुलींना जन्म दिला.
जेव्हा डिंपल आणि राजेश वेगळे राहू लागले
डिंपल खन्ना आणि राजेश 1984 पासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. मात्र, दोघांचा कधीही घटस्फोट झाला नाही. लग्नाच्या अनेक वर्षानंतर डिंपलने 1985 मध्ये 'सागर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. यानंतर तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. त्याचवेळी प्रसिद्ध भारतीय कवी आणि पत्रकार प्रितिश नंदी यांच्या 'द प्रितिश नंदी शो' या शोमध्ये डिंपलने तिच्या लग्नाबद्दल मौन तोडलं.
रिंकी आणि ट्विंकलच्या जन्मानंतर ते वेगळे झाल्याचं डिंपलने सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही दोघं खूप वेगळे-वेगळे लोकं होतो. कदाचित त्यांच्यासोबत काय होत आहे हे समजण्यासाठी मी खूप लहान होते, तो एक सुपरस्टार होता. मी सुपरस्टार नव्हते, त्यामुळे मला स्टार्स आणि त्याचं वागणं समजू शकलं नाही.
असं केलं राजेश यांनी डिंपलला प्रपोज
डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांनी प्रपोज केलेला दिवस आठवून अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही एका कार्यक्रमासाठी प्रायव्हेट फ्लाईटने अहमदाबादला जात होतो. माझ्या शेजारी राजेश खन्ना बसले होते. मी फक्त त्यांच्याकडे बघत होते. मी त्याला म्हणाले, ' तिथे खूप गर्दी असेल. माझा हात धरशील का?' मग तो म्हणाला, 'हो नक्कीच'. मग मी म्हणाले, 'कायमचा धराल का?', बाकी हिस्ट्री आहे'. 18 जुलै 2012 रोजी राजेश खन्ना यांनी मुंबईतील त्यांच्या 'आशीर्वाद' या बंगल्यात अखेरचा श्वास घेतला.