Dharamveer Review : का पाहावा आनंद दिघे यांचा जीवनपट 'धर्मवीर'; वाचा

हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी पाहावा यासाठी कारण...

Updated: May 13, 2022, 04:27 PM IST
Dharamveer Review : का पाहावा आनंद दिघे यांचा जीवनपट 'धर्मवीर'; वाचा title=

सायली कौलगेकर, झी मीडिया, मुंबई  : सिनेमाची सुरुवात होते ती म्हणजे २६ ऑगस्ट २०२१ पासून. यादिवशी तरुण रिक्षाचालक ठाणे स्थानकाबाहेर ग्राहकाची वाट पाहत असतो. त्याचं पहिलं भाडं असतं ते म्हणजे तानिया महापात्रा नावाच्या महिला पत्रकाराचं. ठाण्याच तिला धर्मवीर आनंद दीघे यांच्या श्रद्धाजंली सभेला कव्हरेजसाठी पाठवण्यात येतं. खरंतर बॉलिवूड पार्टीसाठी तिला जायंच असतं पण तिथे तिला जायला मिळत नाही. त्यामुळे ती नाराज असते. मात्र तरीही ती श्रद्धांजली सभेचं कव्हरेज करण्यासाठी जाते. यादरम्यान रिक्षावाला तिला धर्मवीर आनंद दिघे यांची ओळख करुन देतो. आणि सुरु होतो धर्मवीर आनंद दीघे यांचा जीवन प्रवास...

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूच्या पाठी ठाम उभं राहाणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं या सगळ्यातून आनंद दिघे यांची ओळख व्हायला सुरुवात होते. 

आनंद दीघे यांच नाव घराघरात पोहचतं.  सर्वसामान्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहाणारे आनंद दीघे कसे घडले. हे या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

सिनेमात प्रसाद ओकच्या अभिनयाला तोड नाहीये. या सिनेमासाठी प्रसाद ओकने बरीच मेहनेत घेतल्याचं दिसून येतं. त्याच्या अभिनयासोबतचं त्याच्या रंगभूषेला आणि वेशभूषेला काहीच तोड नाही. त्यामुळे अभिनयासोबतचं त्याच्या रंगभूषेला आणि वेशभूषेला न्याय दिला आहे.  रंगभूषाकार विद्याधर भट्टे आणि वेशभूषाकार रश्मी सांवंत यांची मेहनत फळाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

प्रसाद ओकने त्याच्या अभिनयातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या पात्राला न्याय दिला आहे. तो ही भूमिका जगला असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. या सिनेमातील त्याची चाल, वागणूक त्याचे डायलॉग्स सगळंच खूप भारी आहेत त्यामुळे प्रसादला पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील.

एक दिग्दर्शक म्हणून प्रविण तरडेने उत्कृष्ट दिग्दर्शन केलं आहे. प्रविणने सुद्धा या सिनेमाला न्याय दिला आहे. या सिनेमातील संवाद, गाणी मनाला भिडणारी आहेत. काही क्षणी अंगावर काटे येणारे असे डायलॉग्स या सिनेमात आहेत. गुरुपौर्णिमेचा सीन पाहून सहाजिक कोणाच्याही अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येईल हे मात्र नक्की. या सिनेमातील फाईटींग सीन्स सुद्धा अंगावर शहारे आणतात. 

सिनेमात काय खटकलं
बाकी या सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा मकरंद पाध्ये अजून छान भूमिका निभावू शकला असता. सिनेमातील पात्रांची निवड थोडीशी खटकते. सिनेमात शिवसेनेला एक पक्ष म्हणून खूप मोठं करण्यात आलं आहे. अर्थात इथं पात्राची आणि कथानकाची गरज असल्यामुळं ते झालं आहे.  असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिनेमाचा पूर्वार्ध अपेक्षेपेक्षा जास्त मोठा वाटतो. 

हा सिनेमा का पाहावा
हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी पाहावा यासाठी कारण आनंद दिघे राजकरणी असण्यापेक्षा ते माणूस म्हणून किती ग्रेट होते हे या सिनेमात प्रामाणिकणे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाला आम्ही देतोय 4 स्टार.