मुंबई : 'ते आले... त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं...' असंच सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे सोशल मीडियावरील फोटो पाहून अनेकजण म्हणत आहेत. हिंदी कलाविश्वात सर्वाच प्रसिद्ध अशी जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दीप-वीर'ने लग्नसोहळ्यानंतर भारतात पाऊल ठेवलं त्या क्षणी चाहत्यांचा उत्साह अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर सध्या त्यांच्या इटलीतील विवाहसोहळ्याचे काही सुरेख फोटो पोस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. मग ते खुद्द दीपिका आणि रणवीरने पोस्ट केलेले फोटो असो किंवा त्या विवाहसोहळ्यात सहभागी झालेल्या मंडळींनी पोस्ट केलेले फोटो असो.
अशा या रंजक फोटोंच्या गर्दीत लक्षवेधी ठरत आहेत ते म्हणजे दीप-वीरच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे फोटो.
जिथे दीपिका आणि रणवीरने त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी मोजक्या मंडळींनाच आमंत्रित केलं होतं, किंबहुना बी- टाऊन सेलिब्रिटींनाही या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तिथेच या दोघांचे स्टायलिस्ट, मेकअप आर्टीस्ट आणि बॉडीगार्ड, ड्रायव्हर यांना मात्र या सोहळ्याचं अगत्याचं आमंत्रण होतं.
'दीप-वीर'च्या बॉर्डीगार्डनीही एखाद्या हक्काच्या व्यक्तीचं लग्न असल्याप्रमाणेच या सोहळ्याचा आनंद घेतला. सोशल मीडियावर सध्या त्यांचे या सोहळ्यातील फोटो व्हायरल होत असून, अनेकांचीच मनं जिंकत आहेत.