सेक्रेड गेम्सचे निर्माते आणि नवाजउद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल

मोबाईल अॅप नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. 

Updated: Jul 11, 2018, 12:20 PM IST
सेक्रेड गेम्सचे निर्माते आणि नवाजउद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल title=

मुंबई : मोबाईल अॅप नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. मात्र आता ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण वेब सिरीजमधील अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी, नेटफ्लिक्स आणि निर्मात्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान केल्याप्रकरणी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. काँग्रेसचे समर्थक राजीव सिन्हा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या सिरीजमध्ये राजीव गांधी यांचे नाव घेताना अपशब्द वापरण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. 

सिरीज आली अडचणीत

या वेब सिरीजमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील सर्वच मर्यादा ओलांडण्यात आल्या असल्याने भारतीय सिनेसृष्टीचे नाव खराब होत असल्याचे, सिन्हा यांचे म्हणणे आहे. विक्रम चंदा लिखित सेक्रेड गेम्स या कादंबरीवर ही सिरीज आधारित आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी या कादंबरीचे वेब सिरीजमध्ये रुपांतर केले आहे. या वेब सिरीजचे प्रोमोजही जबरदस्त गाजत आहेत. मात्र निर्माते आणि अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकीवर झालेल्या तक्रारीमुळे ही सिरीज अडचणीत सापडली आहे.

ही आहे कथा

या सिरीजमध्ये पोलिस निरीक्षक सतराज सिंगची कथा दाखवण्यात येत असून ८ भागांची ही सिरीज आहे. यात पोलिस निरीक्षक सतराज सिंग भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारत आहे. तर नवाजउद्दीन सिद्दीकी गणेश गायतोंडे या माफीयाची भूमिका साकारत आहे. एक रात्री आलेल्या एका फोनमुळे सतराज सिंगचे आयुष्य कसे बदलते, याची ही गोष्ट आहे.