मुंबई : 'लाफ्टर क्वीन' अशी ओळख असणाऱ्या कॉमेडियन भारती सिंग हिच्यावर सध्या आनंदाची आणि शुभेच्छांची उधळण होत आहे. कारण आहे ते म्हणजे तिचं नुकतंच जन्माला आलेलं बाळ. हो... आता ही कोणतीही थट्टा, मस्करी नाही. कारण भारतीनं खरंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. (Bharti Singh)
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भारतीनं सुरेख फोटो शेअर करत आपल्याला मुलगा झाल्याचं सांगितलं. या फोटोमध्ये भारती आणि तिचा पती, हर्ष अतिशय आनंदात असल्याचं पाहून सर्वांनाच या जोडीचा हेवा वाटत आहे.
भारतीचं कौतुक करावं तितकं कमी
सहसा गरोदरपणात ठराविक महिन्यांपर्यंत महिला काम करतात आणि प्रसूतकाळापूर्वीचे काही दिवस आराम करण्याला प्राधान्य देतात. पण, भारतीनं तसं काही केलं नाही.
प्रसूतीच्या अखेरच्या काळापर्यंत ती काम करत राहिली. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळत होतं.
कोणती इच्छा अपूर्ण ?
गरोदरपणादरम्यान भारतीनं आपण एका गोड मुलीला जन्म देऊ इच्छितो असं सांगितलं होतं. पण, तिची ही इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही.
मला माझ्यासारखीच मेहनती मुलगी पाहिजे असं भारतीनं सांगितलं होतं. पण, तिला झाला मुलगा.
असो. हा झाला गमतीचा भाग. भारती अर्थात तिच्या मुलाच्या जन्मामुळं कमालीची आनंदात आहे. अद्यापहीत तिची किंवा तिच्या बाळाची प्रसूतीनंतरची कोणतीही झलक समोर आलेली नाही.
सध्याचा काळ हा अतिशय काळजी घेण्याचा असल्यामुळं भारती आणि तिचे कुटुंबीय काहीसे माध्यमांपासून दूर दिसत आहेत. पण, परिस्थिती सुरळीत होताच ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल यात शंका नाही.