पुणे : दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण, पोलिसांच्या आदेशाचा भंग, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर पोलीस ठाण्यात अभिनेता संतोष जुवेकरसह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक, यांच्यासह संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त अरण्येश्वर मंडळाच्या अध्यक्षाने रस्त्यावर विनापरवाना मंच उभारला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केल्याचा आरोप आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला मी हजेरी लावली नव्हती. दहीहंडीच्या दिवशी मी ठाण्याच्या माझ्या घरी होतो. मग माझ्यावर गुन्हा दाखल कसा करण्यात आला? असा सवाल संतोष जुवेकरनं विचारला आहे. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळानं मला निमंत्रणही पाठवलं नव्हतं. तरी त्यांनी त्यांच्या बॅनरवर माझा फोटो लावला. त्यामुळे मंडळावर कारवाई करायची का नाही याबाबत मी वकिलांशी बोलणार असल्याची प्रतिक्रिया संतोष जुवेकरनं दिली आहे.