ISRAEL- HAMAS CONFLICT : इस्रायल (israel) आणि पॅलेस्टाईन (Palestine) यांच्यातील जीवघेणा संघर्ष अद्याप सुरुच आहे. तिथल्या नागरिकांसह आता जगभरातील लोकांनाही याची झळ बसताना दिसत आहेत. दोन्ही बाजूंच्या शेकडो लोकांचा या युद्धात आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिकांव्यतिरिक्त परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (nushrat bharucha) ही देखील इस्रायलमध्ये अडकली होती. त्यानंतर आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या युद्धात टीव्ही अभिनेत्री मधुरा नायकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी अभिनेत्रीची चुलत बहीण आणि भावोजी यांची निर्घृण हत्या केली आहे.
नागिन फेम अभिनेत्री मधुरा नाईक (Madhura Nayak) हिने तिच्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले आहेत. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये ती खूप भावूक दिसत आहे. यासोबतच मधुरा नाईकने आपल्या बहिणीचा आणि भावोजींचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. इस्रायल-हमास युद्धात मधुरा नाईकने आपली चुलत बहीण आणि भावोजींना गमावले आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. "मी मधुरा नाईक ही भारतीय वंशाची ज्यू महिला आहे. आम्ही भारतात 3000 उरलो आहेत. 7 ऑक्टोबरच्या एक दिवस आधी आमच्या कुटुंबाने एक मुलगी आणि मुलगा गमावला. माझा चुलत बहीण ओदया आणि तिचा नवरा हे त्यांच्या दोन मुलांसमोर निर्घृणपणे मारले गेले. मी आणि माझे कुटुंब ज्या दु:खातून जात आहोत ते शब्दात व्यक्त करणे फार कठीण आहे. आज इस्रायल दुखात आहे, लहान मुले, महिला आणि वृद्ध हमासच्या आगीत जळत आहेत, असे मुधरा नाईकनंम म्हटलं आहे.
"लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध लोक हमासच्या आगीत जळत आहेत. या सर्वांना टार्गेट केले जात आहे. काल मी माझी बहीण, भावोजी आणि त्यांच्या लाडक्या मुलांचा फोटो शेअर केला जेणेकरून जगाला माझं दुःख समजेल. पण पॅलेस्टाईन कसा अपप्रचार करत आहे हे पाहून मला धक्का बसला आहे. मला सांगायचे आहे की या पॅलेस्टाईन समर्थक प्रचारामुळे इस्रायली लोकांना मारेकरी दाखवले जात आहे. हे बरोबर नाही. स्वतःचा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाही. मी ज्यू असल्यामुळे मला लाज वाटली, अपमानित आणि लक्ष्य केले गेले. मला माझे दुःख माझ्या प्रिय लोकांसोबत शेअर करायचे होते," असेही मधुराने म्हटलं आहे.