मराठी मालिकांमध्ये जातीयवाद; दिग्दर्शक सुजय डहाकेची टीका

या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण 

Updated: Mar 5, 2020, 12:15 PM IST
मराठी मालिकांमध्ये जातीयवाद; दिग्दर्शक सुजय डहाकेची टीका  title=

मुंबई : अवघ्या 23 वर्षी 'शाळा' सिनेमाकरता राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला दिग्दर्शक सुजय डहाके सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 'मराठी मालिकांमध्ये सगळ्या मुख्य भूमिकेतील अभिनेत्री या ब्राम्हणच का?' असा सवाल विचारत त्याने छोट्या पडद्यावर गोंधळ घातला आहे. 'केसरी' सिनेमाच्या निमित्ताने सुजय डहाकेने एका दैनिकाला मुलाखत दिली. यामध्ये त्याने हा सवाल केला आहे. 

मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राम्हण व्यतिरिक्त इतर जातीच्या अभिनेत्री का पाहायला मिळत नाही? असा त्याने यावेळी प्रश्न उपस्थि केला. एवढंच नव्हे तर सुजय डहाकेने एक घडलेला प्रसंग देखील यावेळी शेअर केला. तो म्हणाला की,'मी स्वतः एका मिटिंगमध्ये होतो.. बॅकवर्ड मग ती लागू बंधूची ऍड कशी करणार? या रिऍलिटीमध्ये आहात तुम्ही.'

सुजय डहाकेच्या या वक्तव्यानंतर मालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुजयच्या या स्टेटमेंटवर आता अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तेजश्री म्हणते की,'मी ब्राम्हण नाहीए बरं! CKP आहे.. पण काम आहे माझ्याकडे आणि गेली 'य' वर्षं !! याला Talent म्हणूया का? तेजश्रीने दिलेल्या या उत्तरामुळे चर्चा वाढतच चालली आहे. 

सुजय डहाकेचा 'केसरी' हा सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील कुस्तीवर हा सिनेमा आधारलेला असून महेश मांजरेकर या सिनेमात वस्तादाची भूमिका साकारत आहे. कुस्तीतील 'महाराष्ट्र केसरी' या पुरस्काराच्या अवतीभवती हा सिनेमा फिरतो. विराट मडके याची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. सुजय डहाकेच्या हा चौथा सिनेमा आहे. 'शाळा' या सिनेमाकरता 2012 मध्ये सुजयला 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला होता. त्यानंतर 'आजोबा', 'फुंतरू' आणि आता 'केसरी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.