मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्यो जोमाच्या कलाकारांना त्यांचं वेगळेपण जगासमोर आणण्यास चांगलं सहकार्य मिळत आहे. मुख्य म्हणजे याच माध्यमातून देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असणारे असे काही चेहरा प्रकाशझोतात येत आहेत, हे पाहता कलेसारखा दुसरा कोणताही मौल्यवान दागिना नाही, हेच सिद्ध होत आहे.
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने असाच एक कलाकार चेहरा सर्वांसमोर आणला आहे. सोनू निगमने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारा हा चेहरा सध्या अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. कारण, एक चिमुकली, तिच्या बोबड्या स्वरांमध्ये 'लग जा गले' हे अतिशय कठिण गाणं अगदी सहजपणे सादर करत आहे.
मुळचं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं 'लग जा गले हे' गाणं अनेकांच्याच पसंतीचं आहे. 'वो कौन थी', या चित्रपटातील हे गाणं अनेकांच्याच पसंतीचं. मुळात अतिशय श्रवणीय चाल असणारं असं हे गाणं गाण्यास मात्र तितकंच कठिण. पण, ही लहानगी ज्या अंदाजात ते गात आहे, हे पाहता खुद्द सोनू निगमही भारावला आहे.
तिची प्रशंसा करत त्याने या व्हि़डिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जरा या चिमुरडीला पाहा.... संगीत क्षेत्रात ती मोलाचं योगदान देणार आहे. ही खरंच दैवी देणगी आहे'. शिवाय कलाकार हा मुळात घडलेला असतो. इथे फक्त त्याला पैलू पाडण्याची गरज असते, असं म्हणत एका खऱ्या कलाकाराविषयी सोनूने भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडिओ असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत, शिवाय पाच हजारांहून अधिकजणांनी तो शेअरही केला आहे.