VIDEO : बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यासोबत खिलाडी कुमारची किक बॉक्सिंग

जवानांची भेट घेण्याचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. 

Updated: Mar 20, 2019, 08:40 AM IST
VIDEO : बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यासोबत खिलाडी कुमारची किक बॉक्सिंग title=

नवी दिल्ली : एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो अनेक मार्गांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येतो. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कोणत्या एका उपक्रमातून असो किंवा विविध मार्गांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याच्या मार्गातून असो. अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या बाबतीतही त्याचं वेगळेपण सिद्ध करतो. त्याचं हेच वेगळेपण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे, ते म्हणजे 'केसरी' या चित्रपटाच्या निमित्ताने. 

'केसरी'च्या निमित्ताने विविध प्रसिद्धी कार्यक्रमांमध्ये व्यग्र असणाऱ्या अक्षयने नुकतीच सीमा सुरक्षा दलाच्या सेवेतच असणाऱ्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचीसुद्धा उपस्थिती होती. जवानांची भेट घेत अक्षयने त्यांच्याशी संवाद तर, साधलाच. पण, त्यासोबत 'केसरी'तील गाण्यावर ठेकाही धरला. शिवाय किक बॉक्सिंगचाही अनुभव घेतला. 

मोठ्या खिलाडू वृत्तीने आणि समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेणाऱ्या अक्षयचा हा अंदाज सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. खुद्द खिलाडी कुमारनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो महिला अधिकाऱ्यासह किक बॉक्सिंग खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनच्या माध्यमातून जवानांची भेट घेण्याचा आनंद व्यक्त केला. 'सीमा सुरक्षा दलातील जवानांना भेटण्यात नेहमीच आनंद वाटतो. त्यांचं प्रशिक्षण, जिद्द, कुतूहल हे नेहमीच परमोच्च शिखरावर असतं. हा अनुभव नेहमीच काहीतरी शिकवून जाणारा आणि शिकण्याजोगा असतो', असं त्याने लिहिलं. 

अक्षय सध्या त्याच्या 'केसरी' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सारागढीच्या युद्धावर भाष्य करत २१ शूरवीर जवानांची गाथा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीचती चोप्रा आणि खिलाडी कुमार या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करत असून, ते अस्सल पंजाबी लूकमध्ये या चित्रपटातून झळकणार आहेत.