मुंबई : 'दंगल' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री झायरा वसिम हिने एकाएकी चित्रपट विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. बालकलाकारा म्हणून 'दंगल' चित्रपटातून तिने चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. आमिर खानच्या मुलीची म्हणजेच कुस्तीपटू गीता फोगाट हिच्या बालपणीची भूमिका तिने अतिशय प्रपभावीपणे साकारली होती.
'दंगल'मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आमिरसोबतच ती 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातूनही झळकली होती. पण, आता मात्र तिने एकाएकी चित्रपट विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेकांनाच धक्का बसला आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये झायराने तिच्या या निर्णयाचं कारण स्पष्ट केलं आहे. आपल्या कारकिर्दीला पाच वर्षे पूर्ण होण्याच्याच दिवशी तिने हा महत्त्वाचा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवला. गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या आयुष्याला कशा प्रकारे कलाटणी मिळाली याविषयी तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबतच आपण जे काम करत आहोत त्यामध्ये कोणत्याच प्रकारो आपल्याला आनंद मिळत नसल्याचंही तिने म्हटलं आहे. या विश्वाशी आपलं थेट नातंच नसल्याच्या भावनाही तिने या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. झायराची ही पोस्ट पाहता अंतर्मनाची साद ऐकणाऱ्या या अभिनेत्रीची अनेकांनीच प्रशंसा केली आहे.