Bollywood Director Hospitalised: बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक सावन कुमार टाक यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पुतण्याने ही माहिती दिल्याचे समोर आले आहे. सावन कुमार हे बॉलीवूडचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. सलमान खानच्या सनम बेवफा चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते आणि 'कहो ना प्यार है' या चित्रपटाचे गीतही लिहिले होते.
सावन कुमार टाक यांचे पुतणे नवीन कुमार यांनी एक वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. नवीनने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही त्यांना फुफ्फुसाशी संबंधित समस्या होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असून हृदयाची प्रकृतीही ठीक नसल्याची माहिती समोर येते आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत लवकर सुधारावी म्हणून प्रार्थना केल्या आहेत.
सावन कुमारने अनेक उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ज्यात 'सनम बेवफा', 'सौतन' आणि 'साजन बिना सुहागन' सारखे चित्रपट आहेत. याशिवाय त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांना त्यांच्या चित्रपटातून ब्रेक दिला. या यादीत संजीव कुमार आणि नईम सय्यद यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.
त्यांनी कमी बजेटमध्ये बनवलेला 'नोनिहाल' हा चित्रपट प्रेक्षकांना अतिशय आवडला. दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'गोमती के किनरे' होता ज्यात मीना कुमारी दिसल्या होत्या. 1972 साली रिलीज झालेला हा मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट होता.