मुंबई: असभ्य वर्तणूकीचे आरोप केल्याप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिला कायदेशीर नोटीस पाठवल्याचं वृत्त सोमवारी समोर आलं होतं. पण, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मात्र आपल्याचा अशी कोणतीच नोटीस मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'मला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. जेणेकरुन माझ्यासारख्यांचा आवज दाबता येईल', असं तनुश्री म्हणाली.
आपल्यासारखंच कोणी अशा प्रकारच्या प्रसंगांचा सामना केला असेल तर त्यांनी पुढे येऊन त्याविषयी वाच्यता करावी अशा धमक्यांचा घाबरून जाऊ नये. कारण संपूर्ण राष्ट्र हे तुमच्या समर्थनार्थ उभं आहे, ही महत्त्वाची बाब तिने अधोरेखित केली.
आपल्या देशात आजही असभ्य वर्तन, लैंगिक शोषण या मुद्द्यांकडे तितक्या व्यापक दृष्टीने पाहिलं जात नसल्याचं खंतही तिने व्यक्त केली.
तेव्हा आता या नोटीसमागचं खरं वृत्त नेमकं काय आहे, हेच जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कारण, सोमवारी नानांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनीच तनुश्रीला नानांकडून एक कायदेशी नोटीस पाठवत माफी मागण्यास बजावल्याचं सांगण्यात आलं होतं.
तनुश्री नानांच्या या नोटीसला काय उत्तर देणार याविषयीचे बहुविध प्रश्न उपस्थित होत असतानाच तिने मात्र आपल्यापर्यंत अशी कोणतीही नोटीस पोहोचली नसल्याचंच स्पष्ट केलं.
नोटीस न मिळणाऱ्या तनुश्रीला आता नाना त्यांच्या पत्रकार परिषदेतून काय उत्तर देतात हेच या प्रकरणाचं भविष्य निर्धारित करणार आहे, असंच म्हणावं लागेल.