Afghan Crisis :तालिबानची हिंदुत्त्वाशी तुलना; बॉलिवूड अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

अतिशय संवेदनशील अशा या मुद्द्यावर मतप्रदर्शन करताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं 

Updated: Aug 18, 2021, 06:04 PM IST
Afghan Crisis :तालिबानची हिंदुत्त्वाशी तुलना; बॉलिवूड अभिनेत्रीच्या अटकेची मागणी    title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अफगाणिस्तान (afghanistan) आणि तालिबानच्या (taliban) मुद्द्यावर जागतिक स्तरावरील संघटनांपासून सर्व क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीही आपली मतं आणि प्रतिक्रिया मांडत आहेत. अतिशय संवेदनशील अशा या मुद्द्यावर मतप्रदर्शन करताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं असतानाच असं होताना दिसत नाहीये. 

अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhaskar ) हिनं केलेलं ट्विट पाहता याची प्रचिती येत असून, यामुळं तिच्यावर अनेकांचा रोष ओढावला आहे. विविध बाबतीत परखड मतं मांडणाऱ्या स्वरानं तालिबानच्या दहशतीबाबतही एक ट्विट केलं. यावेळी तिनं ट्विट करताना हिंदुत्व आणि तालिबान या दोन गोष्टींची तुलना केली. ज्यामुळं सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या एका वर्गाचा संताप अनावर झाला आणि त्यांच्याकडून स्वराला अटक करण्याची मागणी करण्यात आली. परिणामी ट्विटरवर #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला. 

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जानंतर महिलांची सुरु आहे 'ही' तयारी 

 

तालिबानी दहशतवादाविषयी लिहिताना स्वरानं ट्विट करत म्हटलं, 'आपल्या हिंदुत्वाची दहशत चालत नाही, आणि आपण तालिबानच्या दहशतवादावर धक्कादायकपणे व्यक्त होतोय. तालिबानच्या दहशतवादावर आपण शांत बसत नाही, हिंदुत्वाच्या दहशतीवरही आपण नाराज होतो. आपली मानवी आणि नौतिक मूल्य मूळ ओळखीवर आधारलेले नसावेत'.

स्वराचं हे ट्विट व्हायरल होताच तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. तिनं आपल्या भावना दुखावल्या आहेत असं म्हणत अनेकांनीच अटकेची मागणी केली. तालिबान आणि हिंदुत्त्वाचा एकाच ओळीत उल्लेखे केलाच कसा, असा सवालही अनेकांनी मांडला. इतकंच वाटतं तर, तिथेच (अफगाणिस्तान) जा असं म्हणत स्वराला नेटीझन्सनी खडे बोल सुनावले. स्वराला एका ट्विटमुळं या परिस्थितीचा सामना करावा लागला. आता या सर्व प्रकरणावर ती पुढे काही प्रतिक्रिया देणार की मौन पत्करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.