‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावर रवीना टंडनचा मोठा खुलासा, म्हणाली 'करण जोहर आजही...'

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील टीना मुखर्जी या पात्रासाठी रवीना टंडनला विचारण्यात आले होते. मात्र तिने याला नकार दिला होता. 

Updated: Jan 16, 2024, 05:57 PM IST
‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावर रवीना टंडनचा मोठा खुलासा, म्हणाली 'करण जोहर आजही...' title=

Raveena Tandon On Karan Johar : बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून रवीना टंडनला ओळखले जाते. रवीना टंडनचे नाव हे सिनेसृष्टीत मोठ्या आदराने घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आगामी कर्मा कॉलिंग या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजचे सध्या ती जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान रवीनाने करण जोहरच्या बहुचर्चित 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाबद्दल खुलासा केला. 

करण जोहरचा बहुचर्चित ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करण जोहरच्या या चित्रपटातील तिन्ही पात्रे विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहितीये का, ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील टीना मुखर्जी या पात्रासाठी रवीना टंडनला विचारण्यात आले होते. मात्र तिने याला नकार दिला होता. 

रवीना टंडनने टीना मुखर्जी या पात्रासाठी नकार दिल्यानंतर राणी मुखर्जीने ही भूमिका साकारली. तिची ही भूमिका सुपरहिट ठरली. तसेच या चित्रपटामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आता हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर करण जोहरची प्रतिक्रिया कशी होती, याबद्दल खुलासा केला आहे. 

करण जोहरची प्रतिक्रिया कशी होती?

यावेळी ती म्हणाली, "करण आजही मला 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात टीना ही भूमिका का साकारली नाहीस, याबद्दल जाब विचारत असतो. त्यावेळी मी त्याला इतकंच सांगते की मित्रा तू मला आणखी काहीही करण्यास सांगू शकतोस. इतकंच नव्हे तर धर्मा प्रॉडक्शनचा एक चित्रपट होता, ज्यात मी, वरुण सूद एकत्र झळकणार होतो. पण दुर्दैवाने तो चित्रपट झाला नाही."

दरम्यान काही महिन्यांपूर्वी रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले होते. “मला करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी विचारणा केली होती. पण मी मात्र या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्याचे कारण म्हणजे काजलच्या तुलनेत माझे पात्र फारच कमी वेळ पडद्यावर दिसणार होते. ते पात्र फारच लहान होतं. तसेच मी आणि काजलने एकत्र सिनेसृष्टीत पदार्पण केले. आम्ही एकाच वयाच्या आहोत. माझे करिअर चांगले सुरु होते. त्यामुळे ज्यात माझी भूमिका ही लहान असेल, अशा चित्रपटात मला काम करायचे नव्हते. यामुळेच मी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कदाचित याच कारणामुळे करण जोहरने मला अद्याप माफ केले नसावे”, असा खुलासा तिने केला होता.