मुंबई : काही कलाकार हे भूमिकेला न्याय देऊन त्यात जीव ओतण्यासाठी ओळखले जातात. बहुविध पात्र अगदी शिताफीनं हाताळणाऱ्या या कलाकारांमध्ये एका अशा अभिनेत्रीचा समावेश आहे, जिनं तिच्या आयुष्यात कायमच काही कठोर निर्णय घेतले. जिनं भरभरून प्रेम केलं. जोडीदारानं साथ सोडली तेव्हा तिनं एकटीनं मुलीचा सांभाळही केला.
उतारवयात असताना या अभिनेत्रीला प्रेमाचं आणि हक्काचं माणूस भेटलं. ही अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. वेब सीरिज, चित्रपट, मालिका, टॉक शो या साऱ्यांच्या माध्यमातून नीना गुप्ता यांनी वेळोवेळी प्रेक्षकांना भारावलं. (Bollywood Actress neena gupta casting couch experiance)
कलाजगतात त्यांचाही प्रवास सोपा नव्हता. आत्मचरित्रपर पुस्तकातून नीना यांनी यासंदर्भातील खुलासा केला. बऱ्याच गोष्टींची फोड त्यांनी या पुस्तकातून केली. एक अनुभव असाही सांगितला जिथं त्यांना आपल्या शरीरातील रक्त आटल्याची अनुभूती झाली.
'सच कहूं तो' या पुस्तकात आपल्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगाविषयी सांगताना त्यांनी जे लिहिलं, ते वाचून अंगावर काटाच येईल. नीना गुप्ता यांना त्यावेळी दाक्षिणात्य कलाजगतातून एका निर्मात्यांचा फोन आला होता. ज्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
पृथ्वी थिएटरमधील परफर्मन्स संपवून त्या एका हॉटेलवर या निर्मात्याला भेटण्यासाठी गेल्या. निर्मात्यानं त्यांना खोलीत बोलावलं तेव्हाच काहीतरी गडबड असल्याची शंका त्यांच्या मनात घर करुन गेली.
याविषयी सांगतचाना त्या लिहितात, 'माझ्या मनानंच मला वर जाण्यापासून रोखलं होतं. त्यांना खाली लॉबीमध्ये बोलण्याची माझी इच्छा होती. पण, काम हातचं निघून जाण्याच्या भीतीनं मी वर गेले. निर्मात्यानं माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. त्यांनी कोणाकोणाला कलाजगतात पुढे आणलं आहे ते सांगितलं.'
नीना यांना मात्र यात रस नव्हता. पुढे त्यांनी थेट विषयाला हात घालत आपल्या भूमिकेविषयी विचारलं. तेव्हा त्यांनी आपला रोल अभिनेत्रीच्या मैत्रीणीचा असेल असं सांगितलं. भूमिका लहान असूनही नीना यांनी त्यासाठी तयारी दाखवली आणि निरोप घेत मित्र वाट पाहत असल्याचं म्हणत त्या तिथून निघाल्या.
कुठे चाललीयस? असा प्रश्न लगेचच त्या निर्मात्यानं केला. तू इथे एक रात्र राहशील? हा त्याचा पुढचा प्रश्न होता. निर्मात्याचा हा प्रश्न नीना यांना हादरा देऊन गेला. डोक्यावर कोणीतरी बर्फाचं पाणी ओतल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन गेली. रक्त आटलं माझं... असं म्हणत त्यांनी पुस्तकात हा प्रसंग किती गंभीर होता ते स्पष्ट केलं.
पुढे निर्मात्यानंच नीना यांची बॅग त्यांच्याकडे देत काहीही करण्यासाठी तुमच्यावर बळजबरी केली जात नसल्याचं सांगितलं. हे ऐकून नीना तिथून निघून गेल्या. कारकिर्दीतला तो दिवस त्या आजही विसरु शकलेल्या नाहीत.