कंगनासारखीच साडी हवी? मोजावी लागेल 'ही' किंमत

विश्वासही बसणार नाही... 

Updated: Aug 19, 2019, 02:00 PM IST
कंगनासारखीच साडी हवी? मोजावी लागेल 'ही' किंमत title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : कलाकार म्हटलं की त्यांच्याभोवती असणारं प्रसिद्धीचं आणि चाहत्यांचं वलय आलंच. त्यातही या कलाकारांच्या राहणीमानापासून त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटपर्यंत बऱ्याच गोष्टींतील बारकावे जाणून घेण्याची उत्सुकता किंबहुना कुतूहलाची भावना सर्वांच्याच मनात असते. यामध्ये स्टाईल स्टेटमेंटविषयी जाणून घेत त्याचा शक्य तितक्या प्रमाणात स्वत:च्या आयुष्यात वापर करण्याकडेही अनेकांचाच कल. पण, इथे आर्थिक गणिताकडेही लक्ष दिलं जातं. 

सेलिब्रिटींप्रमाणे स्टायलिस्ट कपडे घालण्याची इच्छा कितीही असली तरीही त्यांची किंमत पाहता अनेकदा उत्साहाच्या भरात पुढे गेलेली पावलं मागे येतात. पण, या क्षणाला मात्र असं होणार नाही आहे. एका अभिनेत्रीच्या लूकच्या माध्यमातून हे सिद्ध होत आहे. बी- टाऊनची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौत हिचा नवा एअरपोर्ट लूक अर्थात तिने नेसलेली साडी आता तुम्हीही घेऊ शकता. 

कंगनाच्या बहिणीने म्हणजेच रंगोली चंदेल हिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कंगना सुती साडीमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे तिच्या साडीची किंमत हजारोंच्या घरात असेल, म्हणून ती न खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तसं करु नका. कारण, कंगनाची ही साडी तुमच्याही  खिशाला परवडेल अशीच आहे. 

कोलकात्याहून घेतलेल्या या साडीची किंमत पाहून खुदद् कंगनालाही धक्का बसला होता, अशी प्रतिक्रिया तिच्या बहिणीने दिली आहे. अशा चांगल्या पद्धतीचं सुती कापड इतक्या कमी किंमतीला मिळत असल्याचं पाहून विणकरांना किती कमी मोबदला, नफा मिळतो हे वास्तव मात्र तिलाही भेडसावून गेलं. मुख्य म्हणजे फॅशन आणि संस्कृतीचा मेळ साधणाऱ्या क्वीन कंगनाच्या वतीने परदेशी ब्रँडऐवजी भारतीय विणकरांना प्राधान्य द्या अशी विनंती सर्वांना केली आहे.