मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने हा खास दिवस तितक्याच खास अंदाजात साजरा केला. सर्वांच्या लाडक्या अशा या सेलिब्रिटी जोडीने तिरुपती येथील तिरुमला व्यंकटेश्वरा मंदिरात जाऊन तेथेय आपली श्रद्धासुमनं अर्पण केली.
सहजीवनाच्या या वर्षपूर्तीनिमित्त रणवीर आणि दीपिका या दोघांनीही देवाचा आशीर्वाद घेत या क्षणांसाठी त्याचे भाभार मानले. यावेळी दोघांचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित होते. या खास क्षणांसाठी दीपिका आणि रणवीर दोघंही अगदी सुरेखरपणे तयार झाले होते. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीने त्यांना हा पारंपरिक लूक दिला होता. यावेळी दीपिकाने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. तर, रणवीरने तिला साजेसा कुर्ता, चुडीदार, नेहरु जॅकेट असा एकंदर लूक केला होता. 'दीप-वीर'चा हा लूक सर्वांची मनं जिंकून गेला.
मुख्य म्हणजे ही साडी दीपिकासाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरली. अर्थात त्यामागचतं कारणंही तसंच होतं. प्रत्येक कृती किंवा गोष्टीमागे काही आठवणी दडलेल्या असतात. या आठवणी आयुष्यभरासाठी आपली साथ देत असतता. ही साडीसुद्धा दीपिकाला तिच्या विवाहसोहळ्यातील स्वप्नवत क्षणांची आठवण करुन देणारी होती.
साधारण वर्षभरापूर्वीचत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिकाने तिच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये दीपिकाच्या हातात एक थाळा दिसत होता. ज्यामध्ये हळद, कुंकवाच्या वाट्या होत्या आणि एक लाल रंगाची साडी. ही तिच साडी आहे, जी प्रथा म्हणून दीपिकाला तिच्या लग्नात भेट स्वरुपात देण्यात आली होती. सहाजिकत तिच्यासाठी या साडीचं महत्त्वं सर्वतोपरी होतं आणि यापुढेही असेल.