मुंबई : बऱ्याच चर्चा, महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून प्रद्रशनापूर्वीच चर्चांमध्ये असणारा 'कलंक' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिषेक वर्मन दिग्दर्शित या चित्रपटाकडून समीक्षक आणि प्रेक्षकांनाही काही अपेक्षा होत्या. पण, यातही चित्रपट कुठेतरी मागे पडल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता चित्रपटाला आणखी एक फटका बसल्याचं कळत आहे. हा फटका आहे पायरसीचा. कारण, तमिलरॉकर्स या साईटवर हा चित्रपट लीक करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी अपेक्षित सुरुवात मिळूनही 'कलंक'च्या कमाईचे आकडे अतिशय कमी वेगाने पुढे जात आहेत. त्यातही संमिश्र प्रतिक्रियांमुळे चित्रपटाचा मिळणाऱ्या अपेक्षित प्रतिसादातही घट झाली आहे. बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे गडबडलेले असतानात आता चित्रपट लीक झाल्यामुळे त्याचेही थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होणार. त्यामुळे आता प्रेक्षक कलंक चित्रपटगृहात पाहण्यास पसंती देणार की, पुन्हा या बेकायदेशीर लींकवर लीक झालेल्याच चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
गेल्या अनेक वर्षांपासून कलाविश्वात चित्रपटांना पायरसीचा धोका असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे अनेकदा काळजी घेऊन आणि कायदा कठोर करुनही हे प्रमाण काही केल्या कमी झालेलं नाही. याआधीही 'केसरी', 'गली बॉय', 'मणिकर्णिका...', 'सिंबा', 'टोटल धमाल' या चित्रपटांना पायरसीचा फटका बसला आहे. त्यामुळे पायरसीचं हे संकट कसं टाळता येईल असाच प्रश्न साऱ्या कलाविश्वासमोर उभा राहिला आहे.