पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्याची वर्णी

लवकरच बायोपिकमधून उलगडणार 'नमो'...  

Updated: Dec 30, 2018, 12:26 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्याची वर्णी  title=

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी कलाविश्वात बायोपिकता स्थिरावलेला ट्रेंड पाहता अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी याच ट्रेंडमध्ये काही चित्रपट साकारण्याला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये 'ठाकरे', 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटांमागोमाग आता आणखी एका तगड्या कथानकाच्या चित्रपटाचा प्रवेश झाल्याचं कळत आहे. 

देशातील राजकारण आणि त्याच राजकारणाच्या पटलावर असणाऱ्या नेतेमंडळींचा वावर, त्यांना असणारी लोकप्रियता याचा अंदाज घेत आता आणखी एका व्यक्तीमत्त्वाचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. तो प्रवास म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. 

'बॉलिवूड लाइफ' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मोदींच्या आयुष्यावर साकारण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे. अभिनेतार विवेक ओबेरॉय या चित्रपटातून पंतप्रधानांची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं कळत आहे. किंबहुना त्याने या चित्रपटासाठी स्वत:वर काम करण्यासही सुरुवात केली आहे. 

आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत ही सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं खुदद् विवेकचंच म्हणणं आहे. त्यामुळे आता हे आव्हान तो कसं पेलतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याचं कळत आहे. 

अद्यापही नाव निश्चित न झालेल्या या बायोपिकसाठीच्या कलाकार आणि दिग्दर्शकांचीही निवड करण्यात आली आहे. उमंग कुमार यांच्यावर चित्रपट दिग्दर्शकाची जबाबदारी असून, लवकरच या बहुचर्चित चित्रपटातील सहभागी कलाकारांची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे.