मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफशी लग्नगाठ (Katrina Kaif Vicky Kaushal) बांधल्यानंतर विकी कौशल त्याच्या चित्रपट कारकिर्दीला प्राधान्य देण्यासोबतच वैवाहिक आयुष्यालाही तितकाच वेळ देताना दिसला. चित्रीकरणातून वेळ काढत त्यानं कुटुंबालाही प्राधान्य दिलं. एकंदरच या वागण्यावरून कुटुंबाप्रती असणारी त्याची ओढ लगेचच लक्षात येते.
विकीचे आई-वडील, भाऊ, कतरिना असं हसतं खेळतं कुटुंब पाहिल्यानंतर सर्वांनाच त्याचा हेवा वाटतो. पण, याच हसऱ्या कुटुंबावर एक वेळ अशीही ओढावली होती, जेव्हा कुटुंबप्रमुखाच्याच जगण्याची शाश्वती नव्हती.
हो... 2003 मध्ये विकी कौशलच्या वडिलांना कॅन्सरचं (Cancer) निदान झालं आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा हादरा होता. त्यावेळी नेमकं काय झालं होतं, याचा उलगडा खुद्द विकीचे वडील शाम कौशल यांनी केला.
लडाखमधून 'लक्ष्य' चित्रपटाच्या चित्रीकरणावरून परतल्यानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता. पुढे त्यांनी नानावटी रुग्णालयाचा भेट दिली, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली पण त्यातही बरेच अडथळे उदभवले. (Bollywood Actor Vicky Kaushals father Sham Kaushal once batteled with cancer)
विकीचे वडील यापूर्वी appendix च्या तक्रारीमुळे नाना पाटेकर यांच्यासोबत रुग्णालयात गेल्यामुळे डॉक्टरांनी नानांना पुण्यातून बोलवून घेतलं. याबाबत सांगताना शाम कौशल्य यांनी पुढची परिस्थिती शब्दांत मांडली.
कॅन्सरची झुंज आठवताना काय म्हणाले विकी कौशलचे बाबा...
'मी आजारी होतो. माझं पोट बिघडलं होतं. डॉक्टरांनी पोटातील त्वचेचा एक तुकडा तपासणीसाठी पाठवला आणि तिथे कॅन्सरचं निदान झालं. मी जगेन की नाही याची काहीच शाश्वती नव्हती. याची कोणालाच माहितीही नव्हती. मी रुग्णालयात जवळपास 50 दिवसांसाठी होतो. त्यानंतर मी कामावरही परतलो. चाचण्या साधारण वर्षभरासाठी सुरुच होत्या. सुदैवाने कॅन्सर शरीरात पसरला नव्हता', असं सांगताना त्या घटनेला 19 वर्षे उलटल्याचा खुलासा कौशल यांनी केला.
आपण जगणार नाही, या भावनेनं तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवण्याचा विचारही विकीच्या वडिलांच्या मनात आला. पण, पोटात इतक्या वेदना होत्या आणि त्यात शस्त्रक्रिया झाल्यामुळं त्यांना अंथरुणातून उठताही येत नव्हतं.
देवा मला जगवायचं असेल, तर कमकुवत करु नकोस मी असा नाही जगू शकत अशीच याचना त्यावेळी शाम कौशल करत होते. अखेर त्यांनी या आजावर मात केली, सुदैवानं त्यांचं आयुष्य पूर्ववत झालं. विकीच्या वडिलांनी ज्या परिस्थितीचा सामना केला ती वेळ कोणावरही येऊ नये इतकंच काय ते आपण म्हणू शकतो.