मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं महिन्याभरापूर्वी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्यानंतर त्याच्या आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीची सत्र सुरु केली. या चौकशीच्या सत्राअंतर्गतच आता मानसोपचार तज्ज्ञांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळं अत्यंत अनपेक्षित आणि खळबळजनक माहिती समोर आली.
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मधील डिसेंबर महिन्यानंतर सुशांतनं या संदर्भातील उपचार घेण्यास सुरुवात केली होती. मानसोपचार तज्ज्ञांनी जबाब नोंदवताना दिलेल्या माहितीनुसार सुशांतला बायपोलर डिसऑर्डर हा आजार होता. तर, इतर डॉक्टरांच्या अहवालानुसार गेल्या काही काळापासून सुशांत नैराश्याचा सामना करत होता. पण, त्याच्या नैराश्याचं कारण काय होतं, याबाबतची माहिती मात्र समोर आलेली नाही. त्यामुळं आता डॉक्टरांकडून मिळालेली ही माहिती पोलिसांना पेचात टाकून गेली आहे.
वैज्ञानिक भाषेत म्हणावं तर, बायपोलर डिसऑर्डर हा एक असा मानससिक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या वागण्यात अतिशय वेगानं बदल होऊ लागतात. या आजाराला गंभीर स्वरुपाचं नैराश्यही म्हटलं जाऊ शकतं. रुग्णाच्या भावनात्मक स्थितीमध्ये या आजारात अतिशय वेगानं बदल होत असल्याचं आढळून येतं.
मुख्य म्हणजे आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही सुशांतला विश्वास नसल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळं तो एका डॉक्टरची जास्तीत जास्त २ किंवा ३ वेळाच भेटत असे. सुशांतवर उपचार करणाऱ्या जवळपास सर्वच डॉक्टरांच्या माहितीनुसार औषधं घेण्याच्या त्याच्या वेळांमध्ये अनियमितता होती. अखेरच्या वेळी त्यानं ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतले तेव्हा त्याच्यावर बायपोलर डिसऑर्डरचा उपचार सुरु होता.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं सुशांतने डॉक्टरकडे जाण्याऐवजी फोनवरुनच त्यांच्याकडून सल्ले घेण्यास सुरुवात केली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुशांतला देण्यात येणाऱ्या औषधांचा त्यानं योग्य पद्धतीनं वापर केला नव्हता. नैराश्याची परिस्थिती, मानसिक आजार, तणाव अशाच एकंदर परिस्थितीनं अखेर सुशांतवर मारा केला आणि आयुष्याच्या या शर्यतीत त्यानं हार पत्करत आत्महत्येचं गंभीर आणि धक्कादायक पाऊल उचललं.