मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'ला प्रदर्शनापूर्वीच चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटाचा निमित्ताने शाहिद आणि कियाराची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही अनेकांचं लक्ष वेधत आहे.
चित्रपटाच्या याच ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी शाहिद आणि कियाराने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ज्यामध्ये ट्रेलरमधील चुंबनदृश्यांविषयीचा प्रश्न कियाराला विचारण्यात आला. चित्रपटात एकूण अशी किती चुंबनदृश्य आहेत? या प्रश्नाचं उत्तर देत आपण ते काहीच मोजलं नसल्याचं कियारा म्हणाली. यावेळी शाहिदनेही एक वक्कव्य केलं. 'उसीका पैसा है...' (पैसे हे किस साठी/ चुंबनदृश्यांसाठीच आहेत), असं तो म्हणाला.
माध्यमांतील एका प्रतिनिधीच्या प्रश्चानं उत्तर देत हे प्रकरण इथेच थांबलं नाही. तर, त्या व्यक्तीने पुन्हा चित्रपटातील चुंबन दृश्याविषयीचाच प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र शाहिदच्या आवाजाचा सूर पाहता संताप आणि नाराजी लगेचच कळून आली. 'तुझी कोणी प्रेयसी नव्हती का रे बऱ्याच काळापासून? मी म्हटलं की चित्रपट पाहायचा असेल तर पैसे द्यावे लागतील. असं नाही म्हटलं की चुंबनदृश्याचेच पैसे आहेत. तू तोच अर्थ काढलास आणि हीच बाब तुझ्या डोक्यात घर करुन राहिली', असं म्हणत शाहिदने त्या रिपोर्टरला सुनावलं. 'चुंबनदृश्य वगळून काही वेगळे प्रश्न विचारा, या चित्रपटात कलाकारांनी अभिनयही केलं आहे', असं म्हणत शाहिदने ट्रेलर लाँच सोहळ्यात वारंवार चुंबनदृश्याविषयी करण्यात येणाऱ्या प्रश्नाविषयी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. .
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटातून पुन्हा एकदा शाहिदच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा कबीर सिंग आणि त्याच्या आयुष्यातील एका उध्वस्त करणाऱ्या वळणाची कथा प्रेक्षकांना भावते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.