राज, राहुल, कोच कबीर... शाहरुखची कारकिर्द @२७

कलाविश्वात चाहत्यांनी कायमच या अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव केला

Updated: Jun 26, 2019, 11:21 AM IST
राज, राहुल, कोच कबीर... शाहरुखची कारकिर्द @२७  title=

मुंबई : स्वप्ननगरी मुंबईत असंख्य स्वप्न उराशी बाळगत येणाऱ्या गर्दीत एक चेहरा काही वर्षांपूर्वी आला. साथ होती ती जिद्दीची, महत्त्वाकांक्षेची आणि अर्थातच नशिबाची. पाहता पाहता दिवस पालटले, त्या चेहऱ्याला मायानगरीने आपलंसं केलं आणि रुपेरी पडद्याच्या झगमगाटावर त्याची छाप दिसायला सुरुवात झाली. तो चेहरा होता अभिनेता शाहरुख खान याचा. 

'राज', 'कोच कबीर', 'राहुल', 'डॉन' अशा विविध भूमिका साकारणाऱ्या शाहरुखला हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्याच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षांव करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. त्यानेही या खास क्षणांचा आनंद साजरा केला आहे. 

शाहरुखने या निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो, 'कोई ना कोई चाहिये...' या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. दिवानातील तोच अंदाज आणि तो क्षण पुन्हा जागवण्याचा त्याने एक लहानसा प्रयत्न केला. सोबतच आतापर्यंत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने सर्वांचेच सहृदय आभारही मानले आहेत. 

आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ आपण या कलाविश्वात व्यतीत केल्याचा आनंद शाहरुखच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. २७ वर्षांपासून सुरु झालेला शाहरुखचा हा प्रवास अविरतपणे सुरुच आहे. मुख्य म्हणजे त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आजच्या घडीलाही रणवीर सिंग, विकी कौशल या नव्या जोमाच्या अभिनेत्यांना किंग खान तगडं आव्हान ठरत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो बी- टाऊनचा बादशाह आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.