सुखी- आनंदित वैवाहिक आयुष्याचं रहस्य, सांगतोय रितेश देशमुख

पाहा व्हिडिओच्या माध्यमातून त्याने दिलेला मोलाचा सल्ला 

Updated: Jun 25, 2019, 02:09 PM IST
सुखी- आनंदित वैवाहिक आयुष्याचं रहस्य, सांगतोय रितेश देशमुख title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या नात्याने नेहमीच अनेक जोडप्यांना #CoupleGoals काय असतात याची उदाहरणं दिली. रितेश अभिनय कारकिर्द आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत असतानाच जेनेलिया कुटुंबाची काळजी घेण्याला जास्त प्राधान्य देताना दिसली. किंबहुना लग्नानंतर तिने या कलाविश्वातूनही काढता पाय घेतला. अशा या सुपरहिट जोडीच्या सुखी वैवाहिक आयुष्याचं रहस्य ठाऊक आहे? 

लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला पडणारा एकच प्रश्न म्हणजे सुखी आणि आनंदी वैवाहिक आयुष्याचं रहस्य काय? कारण कितीही प्रयत्न केले तरीही लहानमोठे खटके उडतात आणि नात्यात काहीसा तणाव हा असतोच. पण, अभिनेता रितेश देशमुख मात्र यापासून अनेक मैल दूर असल्याचं कळत आहे. 

रितेशच्या वैवाहिक आय़ुष्यात आनंद असण्याचं कारण आहे, त्याला उमगलेलं एक रहस्य. जे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांपर्यंतही पोहोचवलं आहे. 'Happy Wife- Happy Life.... और जीने को क्या चाहिए!!!! ', असं कॅप्शन लिहित जेनेलियाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश सुखी वैवाहिक आयुष्याचं रहस्य सर्वांसमोर आणत आहे. सुरुवातीला रितेश एकटाच दिसणाऱ्या या व्हिडिओमध्ये नंतर जेनेलियाचाही प्रवेश होतो. 

जेनेलियाचा व्हिडिओत प्रवेश करण्याचा अंदाज अनोखा आहे. कारण, रितेश तिचे पाय दाबत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्याचाच उल्लेख तो सुखी वैवाहिक आयुष्याचं रहस्य म्हणून करत आहे. व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलियाचा विनोदी अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही जोडी एका नव्या अंदाजात सर्वांचीच मनं जिंकत आहे असं म्हणायला हरकत नाही.