रणवीरच्या नेतृत्वाखाली '८३'चा संघ रवाना, 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची संघात वर्णी

दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेत झळकणार 'हा' मराठी अभिनेता

Updated: May 28, 2019, 12:57 PM IST
रणवीरच्या नेतृत्वाखाली '८३'चा संघ रवाना, 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची संघात वर्णी  title=

मुंबई : भारतीयांसाठी क्रिकेट ही एक भावना आहे. या देशात क्रिकेट हा खेळ अनेकांसाठी वंदनीय आहे. क्रिकेटचं हे वेड सध्या परमोच्च शिखरावर पोहोचलं आहे. त्यामागे कारणही तसंच आहे म्हणा. २०१९ मधील क्रिकेट विश्वचषकाची लगबग, त्यासाठी रवाना झालेला भारतीय क्रिकेट संघ, त्यांची तयारी या साऱ्यामुळे वातावरण 'क्रिकेटमय' झालं आहे. क्रीडाविश्वाप्रमाणेच चित्रपट वर्तुळातही चर्चा होतेय अशाच एका विश्वचषकाची. पण, हा विश्वचषक आहे, १९८३ च्या काळातील. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला दणक्यात सुरुवात झाली आहे. लंडनमध्ये चित्रीकरणासाठी रुपेरी पडद्यावरील '८३'चा संघ रवाना झाला आहे.

अभिनेता रणवीर सिंग याने त्याच्या सोशल मीडियावरील चित्रपटातील संघाचा फोटो सर्वांच्या भेटीला आणला. ज्यामध्ये रणवीरचा लूक तर लक्षवेधी ठरत आहेच. सोबतच हार्डी संधू, साहिल खट्टर, साकिब सलीम, चिराग पाटील या आणि इतर सर्वच कलाकारांचा लूकही प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. रणवीरच्या नेतृत्वाखाली 'ऑन फ्लोअर' जाणाऱ्या या चित्रपटाच्या संघात एक मराठमोळा चेहराही सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला ओळखता आला का हा मराठमोळा चेहरा? मोठ्या रुबाबात दिसणाऱ्या '८३'च्या संघातील हा चेहरा आहे, अभिनेता आदिनाथ कोठारे याचा. आदिनाथ या चित्रपटात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या सोशल मीडिया पेजवरुन त्याचा एक व्हिड़िओसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो '८३' विषयीची उत्सुकता सर्वांसमोर व्यक्त करत आहे.

वेंगसरकरांच्या रुपातील त्याचा लूकही चर्चेचा विषय ठरत आहे. आदिनाथच्या कारकिर्दीत '८३' म्हणजे एक महत्त्वाचं वळण आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आतापासूनच चित्रपटाविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

कबीर खान दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटातून क्रिकेट १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या यशोगाथेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. १० एप्रिल २०२० रोजी क्रिकेटमधील सुवर्ण अध्यायाला झळाळी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.