मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचंही सांगत आहे. पण, व्हि़डिओच्या शेवटी मात्र तो एक अशी गोष्ट सर्वांसमक्ष आणतो जी पाहता, अनेकांना धक्काच बसतो.
राहुलने त्या हॉटेलमध्ये असतेवेळी व्यायाम केल्यानंतर खाण्यासाठी म्हणून दोन केळी मागवली. ज्यासाठी त्याच्याकडून ४४२ रुपये आकारण्यात आले. ज्याविषयी त्याने उपरोधिक टीका करत, एक व्हिडिओही पोस्ट केला. या सर्व प्रकरणाला सोशल मीडियावरही बरीच हला देण्यात आली. पण, FHRAI म्हणजेच फेडरेशन ऑफ हॉटेल्स ऍण्ड रेस्टॉरंट्स ऑफ इंडियाने मात्र त्या हॉटेलने जे काही केलं, ते सारं रितसर असून, त्यात काहीच चूक नसल्याचंही स्पष्ट केलं.
FHRAI ने या हॉटेलची पाठराखण करत त्यांनी १८ टक्के जीएसटी आकारण्यालाही त्या हॉटेलची गरज म्हटलं आहे. डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तानुसार याविषयी FHRAI च्या उपाध्यक्षपदी असणाऱ्या गुरबख्शसिंग कोहली म्हणाले, ''विविध शहरांमध्ये असणाऱ्या या हॉटेलच्या शाखांमध्ये 'स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोड्यूसर्स'चा अवलंब केला जातो. इथे फळ- भाज्यांची देवाणघेवाण होत नाही, तर राहण्याची सोयदी पुरवली जाते. ज्यामध्ये तेथे येणाऱ्या पाहुण्यांना खाण्यापिण्याच्या सुविधा पुरवल्या जातात. हॉटेलमध्ये केळी (किंवा फळं) ही बाजार मुल्यात विकत घेतली जात असली, तरीही त्याला हॉटेलच्या इतर सुविधा, पदार्थाचा चांगला दर्जा, तो सादर करण्यासाठी वापरली जाणारी भांडी किंवा एखादी अनोखी पद्धत आणि अशा इतरही गोष्टी जोडल्या जातात. त्यावेळी अमुक एक गोष्ट एकटीच ग्राहकापर्यंत पोहोचत नाही', असं ते म्हणाले. रस्त्याच्या कडेला मिळणारी १० रुपयांची कॉफी एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये १५० रुपये किंमतीला मिळू शकते, या उदाहरणाचीही त्यांनी जोड दिली.
You have to see this to believe it. Who said fruit wasn’t harmful to your existence? Ask the wonderful folks at @JWMarriottChd #goingbananas #howtogetfitandgobroke #potassiumforkings pic.twitter.com/SNJvecHvZB
— Rahul Bose (@RahulBose1) July 22, 2019
आपल्या भूमिकेवर ठाम राहत FHRAIने संबंधित हॉटेलकडून आकारण्यात आलेल्या किंमतीत काहीही गैर नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी करप्रणालीची काही उदाहरणंही स्पष्ट केली. दरम्यान, राहुल बोसकडून अवघ्या दोन केळ्यांसाठी ४४२ रुपये आकारणाऱ्या हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. हॉटेलकडून कारणे दाखवा नोटीसला अपेक्षित उत्तर देता आलं नसल्यामुळे त्यांना हा दंड भरावा लागला होता.