विराटच्या असभ्य वर्तणुकीविषयी नसिरुद्दीन शाह लिहितात...

त्याचा अहंकार..... 

Updated: Dec 18, 2018, 09:11 AM IST
विराटच्या असभ्य वर्तणुकीविषयी नसिरुद्दीन शाह लिहितात...  title=

मुंबई : अतिशय कमी वेळात भारतीय क्रिकेट संघात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या विराट कोहलीविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अफलातून फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तितकंच प्रभावी नेतृत्व या गोष्टींची सुरेख सांगड घालत विराट मैदानावर येतो आणि भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीमध्ये आपलं मोलाचं योगदान देतो. विराट मैदानात जितक्या शिताफीने वावरतो अनेकदा तो तितकाच आक्रमकही होतो. बऱ्याचदा त्याच्या स्वभावाची वेगळी बाजूही पाहायला मिळते. 

कोणत्याही गोष्टीविषयी थेट शब्दांमध्ये आपली बाजू मांडण्याचा त्याचा हा काहीसा अहंकारी स्वभाव खटकणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अशा या खेळाडूच्या स्वभावाविषयी ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी एक विधान केलं. ज्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

'विराट हा फक्त एक सर्वोत्तम फलंदाज नाही. पण, जगातील सर्वात वाईट वर्तणूक, स्वभाव असणारा खेळाडू आहे. त्याचं कौशल्य हे नेहमीच अहंकार आणि या वाईट स्वभावामुळे झाकोळलं जातं...', असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं. ज्यापुढे त्यांनी देश सोडण्याचा आपला कोणताच मनसुबा नसल्याची उपरोधिक ओळही लिहिली. 

विराटनेच काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीमध्ये या आशयाची ओळ म्हटली होती. भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याऐवजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील फलंदाजांची प्रशंसा करणाऱ्या चाहत्यांना त्याने धारेवर धरलं होतं. भारतीय खेळाडूंची साथ न देणाऱ्यांनी देश सोडावा, असं वक्तव्य त्याने केल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यानंतरही त्याच्यावर अनेकांचाच रोष ओढावला होता. 

दरम्यान, विराटची तिच ओळ ओधोरेखित करत शाह यांनीही तिचा वापर आपल्या पोस्टमध्ये केला. त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. त्यातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. काही चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या सध्याच्या प्रदर्शनाला निशाणा करत शाह यांच्या पोस्टला दुजोरा दिला. तर, काहींनी मात्र त्यांच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. आता यावर खुद्द विराट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.