मुंबई : 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन यानं हिंदी कलाजगतामध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटापासून सुरु झालेला त्याचा प्रवास आता जवळपास 10 वर्षे पुढं आला आहे. कुतूहलाची बाब म्हणजे, त्याचा पहिला चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला होता त्याच दिवशी त्याचा आगामी चित्रपट 'भुल भूलैया 2'सुद्धा प्रदर्शित होणार आहे. (Kartik Aryan Bollywood Movies)
एक नवोदित अभिनेता म्हणून त्यानं या कलाजगतामध्ये खूप सारे चढ- उतार पाहिले. हा प्रवास मागे वळून पाहताना कार्तिकच्या मनातही आनंद दाटून येतो.
पैसा, प्रसिद्धी चाहत्यांचं अमाप प्रेम या सर्व गोष्टी त्याला ओघाओघानं मिळाल्याच. पण, असं असतानाही काही गोष्टींपासून विशेष म्हणजे काही माणसांपासून मात्र तो दुरावला.
ही माणसं कोण? तर, ही माणसं आहेत कार्तिकचे कुटुंबीय आणि हक्काचे मित्र. एका मुलाखतीमध्ये त्यानं मनातील ही खंत बोलून दाखवली.
'मी जेव्हाही कुटुंबासोबत जेवणासाठी बाहेर जातो, तेव्हा मला तिथे माझे असे निवांत क्षण मिळतच नाहीत. चाहते सेल्फी घेण्यासाठी तिथं येतात आणि मी त्यांना नकार देऊ शकत नाही', असं तो म्हणाला.
आपण ज्यांच्यासोबत आलो आहोत ते मात्र या गोष्टीवर चिडतात, नाराज होतात. कारण, माझा अधिकाधिक वेळ सेल्फी आणि फोटोंमध्येच जातो. कुटुंब आणि मित्रपरिवार याबाबतची तक्रार कायमच करत असतो असं सांगत आता तर त्यांनी मला वगळण्यास किंवा माझ्यासोबत येण्यास नकार द्यायची सुरुवात केल्याचं तो म्हणाला.
मीच आकर्षणाचा केंद्रबिंदू होत चाललो आहे, असा त्यांचा समज असून मला सोबत नेलं तर अडचण होईल, असंही ते म्हणायला मागेपुढे पाहत नाहीत.