'एनएसडी'ची शिष्यवृत्ती मिळवण्यापासून नाव बदलण्यापर्यंत असा आहे इरफानचा प्रवास

अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता

Updated: Jan 8, 2019, 07:40 AM IST
 'एनएसडी'ची शिष्यवृत्ती मिळवण्यापासून नाव बदलण्यापर्यंत असा आहे इरफानचा प्रवास  title=

मुंबई : अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता इरफान खान हा सध्या भारतात नसला तरीही त्याचावर असणारं चाहत्यांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. इरफान सध्या न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर नावाच्या आजारावर परदेशात उपचार घेत असून एखाद्या योद्ध्याप्रमाणेच तो या आजाराशी दोन हात करत आहे. इरफानच्या नावाची अचानक चर्चा होण्याचं कारण आहे नुकताच पार पडलेला त्याचा ५२ वा वाढदिवस. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी... 

*साहबजादे इरफान अली खान, असं त्याचं खरं नाव असून राजस्थानच्या जयपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. 

*इरफानने 'सलाम बॉम्बे' या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केलं असून, १९८८ च्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. 

*इरफानचा 'लंच बॉक्स' हा असा एकमेव चित्रपट आहे ज्याला टोरंटो चित्रपट महोत्सवात क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड मिळाला होता. 

*ऑस्कर पुरस्कार विजेत्या इंटरस्टेलर या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठीही त्याला विचारण्यात आलं होतं. पण, वेळेचं कारण देत त्याने हा प्रस्ताव नाकारला होता. 

*बालपणापासूनच इरफानला क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती. पण, कुटुंबाचा यासाठी विरोध होता. ज्यानंतर त्याने जयपूर येथूनच एमएचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, म्हणजेच एनएसडीमधून शिष्यवृत्ती मिळवत आपला पुढील प्रवास सुरू ठेवला. 

*फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे, तर 'ज्युरासिक वर्ल्ड', 'लाईफ ऑफ पाई', 'इन्फर्नो', 'द अमेझिंग स्पायडर मॅन' आणि 'स्लमडॉग मिलेनियरट या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

*इरफानचं नाव हे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्याने त्यातही बदल केल्याचं कळतं. इरफान खान या नावामुळे त्याला दोनदा अमेरिकेच्यचा एअरपोर्टवर रोखण्यात आलं होतं. दहशतवादाच्या संशयामुळे हा सारा प्रकार घडला होता. ज्यानंतर त्याने आपल्या नावात बदल केल्याचं म्हटलं जातं. असा हा अष्टपैलू अभिनेता म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.